रांची : एका तान्ह्या बाळाच्या सीटीस्कॅनसाठी ५० रूपये कमी पडत होते, आणि चाचणी झाली नाही, यामुळे आमचं बाळ दगावल्याचा आरोप बाळाच्या पित्याने केला आहे. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीच्या राजेंद्र इन्सिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या हॉस्पिटलमधील ही घटना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोष कुमार यांच्याकडे १ हजार ३०० रूपयेच होते. त्यांनी ही बाब लॅबच्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितली. मात्र १ हजार ३५० रूपये घेऊन या त्याशिवाय सिटी स्कॅन होणार नाही अशी आडमुठी भूमिका या लॅब कर्मचाऱ्यांनी घेतली आणि संतोष कुमार यांना टेस्ट न करताच तिथून पाठवून दिलं. मात्र यानंतर संतोष कुमार यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.


आरआयएमएस रूग्णालयात सिटी स्कॅनची फी १ हजार ३५० रूपये आहे, संतोष कुमार यांच्याकडे १ हजार ३०० रूपये होते,  जे त्यांनी सिटी स्कॅनसाठी भरले, मात्र १ हजार ३५० रूपये भरल्याशिवाय आम्ही सिटी स्कॅन करणार नाही, असे सिटी स्कॅन लॅबच्या कर्मचाऱ्यांनी घेतली. सिटी स्कॅन न होऊ शकल्याने हे बाळ दगावले आहे.


संतोष कुमार यांच्या तान्ह्या बाळाच्या डोक्याला जखम झाली, त्यामुळे या बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी या मुलाची तपासणी केली आणि सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संतोष कुमार आपल्या बाळाला घेऊन सिटी स्कॅन लॅबमध्ये गेला. सिटी स्कॅनची फी १ हजार ३५० रूपये असल्याचे त्याला सांगण्यात आले. 


 या बाळाच्या मृत्यूला रूग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप या बाळाचे वडिल संतोष कुमार यांनी केला. या बाळाच्या सिटी स्कॅनसाठी फक्त ५० रूपये कमी पडत होते, म्हणून ही चाचणी झाली नाही, अखेर या बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप आहे.