जम्मू काश्मीरच्या रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्याची पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांकडून याप्रकरणी सखोल तपास करत असून आतापर्यंत 50 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. 9 जून रोजी दहशतवाद्यांनी भाविकांनी भरलेल्या बसवर हल्ला केला होता. गोळीबारानंतर बस दरीत जाऊन कोसळली होती. अनेक भाविक या हल्ल्यात जखमी झाले होते. दिल्लीत एनडीए सरकारचा शपथविधी सुरु असतानाच जम्मू काश्मीरमध्ये हा हल्ला झाला होता. दरम्यान या हल्ल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांडा एरिया पोलिस स्टेशन, पौनी येथील पोलिसांच्या नेतृत्वात सखोल तपासानंतर या संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हल्ल्यात संभाव्य सहभाग असणा-यांची ज्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.


"हल्ला घडवून आणण्यात संभाव्यपणे सहभागी असणाऱ्यांची पटवण्यात आणि पकडण्यात मदत करण्यासाठी महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. सर्वसमावेशक तपास व्हावा यासाठी अर्नास आणि माहोरेच्या दूरवरच्या भागात शोध मोहिमेचा विस्तार करण्यात आला आहे. या ऑपरेशन्सचे उद्दिष्ट पुढील पुरावे उघड करणे आणि या दुर्गम भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना पकडणं आहे," अशी माहिती प्रवक्त्यांनी दिली आहे. 


कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्यासाठी आणि परिसरातील सर्व रहिवासी, नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहेत. रियासीचे एसएसपी मोहिता शर्मा यांनी नागरिकांना सतर्क राहण्याची आणि काही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ सुरक्षा यंत्रणांना कळवण्याची सूचना केली आहे.