नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चारही आरोपी तिहार जेलमध्ये कैदेत आहेत. दोषींच्या सुरक्षेसाठी जेल प्रशासनाकडून जवळपास ५० हजार रुपये खर्च केला जात आहे. न्यायालयाकडून चारही दोषींना डेथ वॉरंट जाहीर करण्यात आल्यानंतर हा खर्च सुरु करण्यात आला आहे. दोषींना ठेवण्यात आलेल्या कोठडीबाहेर दररोज तैनात असणारे ३२ सुरक्षारक्षक आणि फाशी देण्यासाठी करण्यात येणाऱ्या इतर कामांसाठी हा खर्च करण्यात येत आहे. दोषींवर करडी नजर ठेवण्यासाठी, त्यांना योग्य विश्रांती मिळण्यासाठी दर दोन तासांनी सुरक्षारक्षकांची शिफ्ट बदलली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेल सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही दोषींना तिहार जेलच्या ३ नंबरमध्ये वेग-वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे. प्रत्येत दोषीच्या कोठडीबाहेर दोन सुरक्षारक्षक तैनात आहेत. यापैकी एक हिंदी आणि एक इंग्रजी भाषेचं ज्ञान असणारा तमिळनाडू विशेष पोलीस दलातील जवान आणि एक तिहार जेलचा प्रशासक तैनात असतो.


प्रत्येक दोन तासांनी या सुरक्षारक्षकांना आराम करण्यासाठी देण्यात येतो. दोन तासांनी शिफ्ट बदलल्यानंतर दुसरे दोन सुरक्षारक्षक तैनात केले जातात. प्रत्येक एका दोषीसाठी २४ तासांसाठी आठ सुरक्षारक्षक तैनात केले जातात. म्हणजेच चार दोषींसाठी जवळपास ३२ सुरक्षारक्षक आहेत. हे सुरक्षारक्षक २४ तासांत ४८ शिफ्टमध्ये काम करत आहेत. 


जेल अधिकाऱ्यांनी दिेलेल्या माहितीनुसार, डेथ वॉरंट जाहीर होण्याआधी या चारही दोषींना वेग-वेगळं न ठेवता इतर कैद्यांसोबतच ठेवण्यात आलं होतं. मात्र डेथ वॉरंट जाहीर झाल्यानंतर दोषींनी आत्महत्या करु नये, कोठडीतून पळून जाऊ नये किंवा इतर कोणतीही अशी गोष्ट घडू नये ज्यामुळे फाशी देण्यासाठी अडथळा निर्माण होईल, त्यासाठी प्रत्येक दोन तासांच्या शिफ्टमध्ये सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरांसह दोषींवर नजर ठेवली जात आहे. 


निर्भयाच्या चारही दोषींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे.