खिचडी भाजपसाठी दलित मतं खेचून आणणार?
दिल्लीतील रामलिला मैदानात भीम महासंगम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
नवी दिल्ली : दिल्लीतील रामलिला मैदानात भीम महासंगम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. याच कार्यक्रमात भाजपनं तब्बल ५ हजार किलो खिचडी शिजवली. मैदानातल्या एका भल्या मोठ्या कढईत ही खिचडी तयार करण्यात आली. समरसता खिचडी असं या खिचडीचं नाव ठेवण्यात आलं. अनुसूचित जाती जमातीच्या ३ लाख कुटुंबांकडून ही खिचडी शिजवण्यासाठी डाळ आणि तांदूळ घेण्यात आले. त्यासाठी भाजप गेले तीन महिने काम करत होते. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही खिचडी तयार केली.
तब्बल २५ हजार लोकांनी या खिचडीचा आस्वाद घेतला. या खिचडीच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे. भाजपची ही खिचडी म्हणजे दलितांशी नव्यानं नातं जोडण्याचा प्रयत्न समजला जातोय. या कार्यक्रमामुळे खिचडीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये विक्रमही झाला आणि आगामी निवडणुकीत अनुसूचित जाती जमातींच्या मतांवर डोळा ठेवत भाजपचा समरसतेचा प्रयत्नही झाला.