#CAA उत्तरप्रदेशात सहा आंदोलकांचा मृत्यू... सोशल मीडियावरून पोस्ट केल्या डिलीट
राज्याच्या राजधानीसहीत १५ जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय
लखनऊ : नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) विरोधात उत्तर प्रदेशात आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात या आंदोलनात आत्तापर्यंत सहा जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिजनौरमध्ये दोन जण ठार झाले तर कानपूर, आगरा आणि मेरठमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. गुरुवारी लखनऊमध्ये विरोध प्रदर्शनादरम्यान गोळीबारात गोळी लागल्यानं एकाचा मृत्यू झाला. अप्पर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत हिंसेत एकूण १५ जण गंभीर जखमी झालेत.
१३ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या राजधानीसहीत १५ जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. राज्यात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलीय. तसंच २२ डिसेंबर रोजी होणारी यूपी टीईटी (TET) ची परीक्षाही रद्द करण्यात आलीय. या परीक्षेत ७५ जिल्ह्यांतील जवळपास १६ लाख विद्यार्थी सहभागी होणार होते.
उल्लेखनीय म्हणजे, गुरुवारी सायंकाळी राज्यभरात हिंसकता पसरवणाऱ्या ३०३६ फेसबुक पोस्ट, १७८६ ट्विटर पोस्ट आणि ३८ यूट्यूब पोस्ट डिलीट करण्यात आल्यात.
शुक्रवारी अनेक जिल्ह्यांत आंदोलक रस्त्यावर उतरले. गोरखपूर, बिजनौर, फिरोजाबाद, संभल, कानपूर सहीत अनेक जिल्ह्यांत पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. बिजनौरच्या नेहटौरमध्ये आज आंदोलनकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर सहाहून अधिक पोलीस जखमी झाले. बिजनौरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. फिरोजबादमध्येही हिंसक आंदोलनात आत्तापर्यंत ९ जण जखमी झालेत. यामध्ये ४ पोलिसांचाही समावेश आहे.