नवी दिल्ली : काँग्रेस सरकारच्या काळात सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र, आम्ही कधीही राजकारण केले नाही. वरिष्ठ काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी हा दावा केला. हे सर्जिकल स्ट्राइक कधी केले त्या तारखासुद्धा सांगितल्या. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुद्धा युपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राईकही झाले होते, पण आम्ही मतांसाठी त्याचा वापर केला नाही, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला. सध्या लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु असून मोदी सरकार एअर स्ट्राइकचा उल्लेख करत मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात सहा सर्जिकल स्ट्राईक केले आहेत.


'आम्ही कधीही गाजावाजा केला नाही'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात दोन सर्जिकल स्ट्राईक झाले होते. आम्ही कधीही सर्जिकल स्ट्राईकचा गाजावाजा केला नाही. ज्यांनी फक्त एक सर्जिकल स्ट्राईक केले, ते आपली पाठ थोपटून घेत आहेत. डॉ. मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी कधीही पत्रकार परिषद घेऊन सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सांगितले नाही, असे राजीव शुक्ला यांनी पत्रकारांना सांगितले.


दरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही युपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइकही झाले होते. मात्र, आम्ही मतांसाठी त्याचा वापर केला नाही. त्याचवेळी मनमोहन सिंग यांनी मोदी सरकार आर्थिक स्तरावर अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला. मोदी सरकार आर्थिक स्तरावरील अपयश लपवण्यासाठी लष्कराच्या शौर्याचा लाभ उठवत आहे, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मनमोहन सिंग यांनी हे भाष्य केले.


या तारखेला केले सर्जिकल स्ट्राईक 


१९९९ ते २००४ दरम्यान केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. २००४ ते २०१४ दरम्यान संपुआच्या राजवटीत मनमोहन सिंग पंतप्रधान होते. जम्मू-काश्मीरच्या भट्टल सेक्टरमध्ये १९ जून २००८ मध्ये पहिला, २०११ मध्ये ३० ऑगस्टला शारदा सेक्टरमध्ये दुसरा, सहा जानेवारी २०१३ रोजी सावन पत्रा चेकपोस्टमध्ये तिसरा, २०१३ सालीच २७-२८ जुलैला नाझापीर सेक्टरमध्ये चौथा, ६ ऑगस्ट २०१३ साली नीलम खोऱ्यात पाचवा आणि १४ जानेवारी २०१४ रोजी सहावा सर्जिकल स्ट्राईक केला असा दावा राजीव शुक्ला यांनी केला.


वाजपेयी सरकारच्या राजवटीत २००० साली सैन्याने २१ जानेवारी रोजी नीलम व्हॅलीत आणि १८ सप्टेंबर २००३ रोजी पूँछमध्ये बारोह सेक्टरमध्ये दुसरा सर्जिकल स्ट्राईक केला होता, अशी माहिती शुक्ला यांनी दिली.