मुंबई : देशातील कलावंतांमध्ये सरकारच्या बाजूने आणि विरोधात असे दोन गट पडलेत. देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या घटनांवर तोडगा काढण्यासाठी बॉलिवूडमधील ४९ सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. त्याला उत्तर म्हणून सरकारच्या बाजूनं ६१ मान्यवरांनी एक खुलं पत्र लिहिलंय. या ६१ जणांमध्ये कंगना रानौत, विवेक अग्निहोत्री, पंडित विश्वमोहन भट यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. देशातील काही वर्ग मुद्दाम निवडक घटनांविषयी चुकीचा दृष्टीकोन जाणून बुजून करण्याचा प्रयत्न करतात. शिवाय काही घटनांकडे मुद्दाम डोळेझाक करतात. अशानं देशातील वातवरण दूषित होत असून सामाजिक सलोख्याला धोका निर्माण होत असल्याचा दावा या पत्रात करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबद्दल बोलताना 'काही लोक खोट्या कथा तयार करून आपली शक्ती आणि पदाचा दुरुपयोग करत आहेत. हे सद्य सरकारसाठी योग्य नाही. देशात पहिल्यांदाच गोष्टी योग्य दिशेने पुढे जात आहे. आपण एक प्रमुख बदलाचा भाग आहोत. देशाच्या भल्यासाठी गोष्टी बदलत आहेत आणि त्यावरही लोकांना राग येतोय' असं अभिनेत्री कंगना रानौत हिनं म्हटलंय. 


याअगोदर, ४९ सेलिब्रिटींनी 'जय श्रीराम'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. त्यांनी पत्रात वाढत्या असहिष्णूतेबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसंच अनेक ठिकाणी गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीवरुन कलाकार, लेखकांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकरणांमध्ये कारवाई होते का? असा सवाल उपस्थितही केला होता. दक्षिण चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम, बॉलिवुडमधील आघाडीचा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह ४९ जणांनी यावर सही केली होती.


उल्लेखनीय म्हणजे, देशातील कलावंतांमध्ये असे गट पडण्याची पहिली वेळ नाही. २०१४ नंतर वारंवार कलावंतांमध्ये सरकारच्या बाजूने आणि सरकारच्या विरोधात असे गट बघायाला मिळाले आहेत. त्याचीच पुढची आवृत्ती आता मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातही बघायला मिळतेय.