परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारचा `हा` प्लान
सरकारकडून परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी काम सुरु करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या या संकटात जवळपास 2 लाख भारतीय परदेशात अडकले आहेत. सरकारकडून परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी काम सुरु करण्यात येणार आहे. अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 7 मे ते 13 मे या कालावधीत 64 विमानांद्वारे त्यांना आणण्याची तयारी करण्यात येत आहे. 14 हजार 800 भारतीयांना येथे आणण्यात येणार आहे. टप्प्या-टप्प्याने या विमानांची उड्डाणं होणार आहेत. नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
विमानातून येणाऱ्या प्रवाशांकडून विमान भाडे घेण्यात येणार आहे. लंडन-दिल्ली या उड्डाणासाठी प्रत्येक प्रवाशाकडून 50 हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. तर ढाका-दिल्ली उड्डाणासाठी प्रत्येकी 12 हजार रुपये विमान भाडे आकारण्यात येणार आहे.
नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून येणाऱ्या लोकांची चाचणी करण्यात येणार असून त्यांना 14 दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. एयर इंडियाकडून 7 मे ते 13 मेपर्यंत प्रवाशांना भारतात आणण्यासाठी विमानं पाठवण्यात येणार आहेत. प्रवासापूर्वी भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांची मेडिकल चाचणी करावी लागणार आहे. कोरोना व्हायरसचं एकही लक्षण नसलेल्यांनाच भारतात परत आणलं जाणार आहे.
ज्या देशात भारतीय आहेत, त्या देशातील भारतीय दुतावास आणि उच्चायोग तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांची यादी तयार करत आहेत. परदेशातून येणाऱ्या भारतीयांना, भारतात दाखल झाल्यानंतर आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणं गरजेचं असणार आहे.
सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एयर इंडिया आणि त्यांची सब्सिडरी एयर इंडिया एक्सप्रेसची 64 विमानं 12 देशांत अडकलेल्या भारतीयांना परत आणणार आहे. या देशांमध्ये यूएई, यूके, यूएस, कतार, सौदी अरब, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, बांग्लादेश, बहरीन, कुवेत आणि ओमान या देशांचा समावेश आहे.
यूएईसाठी 10 विमानं उड्डाण करणार आहेत. यूएईमध्ये जवळपास दीड लाख भारतीय अडकले आहेत. त्याशिवाय 7 विमानं यूएस, 7 यूके, 5 सौदी अरब, 5 सिंगापूर आणि 2 विमानं कतारकडे उड्डाण करणार आहेत.