गुलबर्गा : Kalaburagi Bus Accident : बस अपघाताची मोठी बातमी. गोव्यात फिरायला गेलेल्यांच्या बसला गुलबर्गा येथे भीषण अपघात झाला. गुलबर्गा शहराबाहेरील हैदराबाद- सोलापूर राज्य मार्गावरील कमलापूर गावाजवळ आज सकाळी ही दुर्घटना घडली. अपघातानंतर बसने पेट घेतला. यात 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 13 जण जखमी झाले आहेत. हैदराबाद-स्थित एका खासगी बसने मालवाहू वाहनाला धडक दिल्याने हा अपघात झाला. कलबुर्गी जिल्ह्यातील कमलापूर गावाजवळ अपघातानंतर बसला मोठी आग लागली. या आगीत बसचा कोळसा झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हैदराबाद येथील प्रवासी या खासगी बसने आपल्या गावी परत होते. त्यावेळी  गुलबर्गा येथे भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने बसमधील सात प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्‍यान, तेरा जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना गुलबर्गा येथील खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


हैदराबादचे रहिवासी असलेले प्रवासी हैदराबाद येथील ऑरेंज या संस्थेच्या खासगी बसने गेल्या दोन दिवसांपूर्वी गोव्याकडे पर्यटनासाठी रवाना झाले होते. गोव्यात पर्यटनस्थळांना भेटी देऊन ते आज हैदराबादकडे परतत होते. यावेळी गुलबर्गा शहराच्या बाहेर असलेल्या सोलापूर-हैदराबाद राज्यमार्गावर कमलापूर गावाजवळ समोरुन येणाऱ्या कंटेनरला बसने जोराची धडक दिली. या अपघातात बसने पेट घेतल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली.


बसमध्ये एकूण एकोणतीस प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर बसने अचानक पेट घेतल्याने बसमधील प्रवाशांची गोंधळ उडाला. या वेळी बसमधील तेरा प्रवासी गंभीर जखमी झाले. कंटेनर चालकाचे दोन्ही पाय मोडले असून, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.