रायबरेलीत एक्स्प्रेसचे 5 डबे रुळावरुन घसरले, 7 जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातात अनेक जण जखमी
रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या रेल्वे अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटेच्या सुमारास न्यू फराक्का एक्स्प्रेस हरचंदपूर स्थानकावर येत असताना इंजिनासह पाच डबे घसरले. अपघातानंतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. मृतांमध्ये एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमी असलेल्या प्रवशांना 1 लाख रुपये तर किरकोळ जखमी प्रवाशांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लखनौ आणि वाराणसीतून एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी रवाना केल्या आहेत. सध्या स्थानिक नागरिक आणि हरचंदपूर स्टेशनवरील रेल्वे कर्मचारी प्रवशांना मदत करत आहेत. हरचंदपूर स्थानकाबाहेर रुळ बदलताना डबे घसरले असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं आता समोर आलंय. 21 प्रवासी जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.
रेल्वे रायबरेलीहून दिल्लीकडे जात होती. घटनेचे वृत्त कळताच स्थानिक लोकं ही मदतीला धावले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.