अस्थिविसर्जनासाठी प्रयागराजला गेलेल्या नांदेडमधील ७ जणांना जलसमाधी
हे मृतदेह दुपारी ३च्या सुमारास नांदेडला विशेष विमानाने आणले जाणार आहेत.
उत्तर प्रदेश : प्रयागराजला यमुना नदीच्या पात्रावर अस्थिविसर्जन करून परतताना बोट उलटून ७ जणांना जलसमाधी मिळाली. हे सातही प्रवासी नांदेड जिल्ह्यातील आहेत. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कोळंब येथील ते रहिवासी आहेत. बैस कुटुंब आपल्या नातेवाईंकाच्या अस्थिविसर्जनासाठी यमुना नदीच्या पात्रावर गेले होते. यात एकूण १४ जणांचा समावेश होता. अस्थिविसर्जन करुन परतत असताना ही घटना घडली.
बोटीमध्ये पाणी शिरल्याने ही घटना घडली. बोटीत एकूण १४ जण होते. पाण्यात १४ जण बुडाले. पण स्थानिकांच्या मदतीने काहीजणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. ८ जण बुडाले असून त्यातून ७ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. यात ३ सदस्य हे बैस कुटुंबातील आहेत. परभणीतील त्यांच्या ३ नातेवाईकांचाही मृतांमध्ये समावेश आहे. एका मृतदेहाचा शोध अजून सुरु आहे. रमेश बैस असे त्यांचे नाव आहे. हे मृतदेह दुपारी ३च्या सुमारास नांदेडला विशेष विमानाने आणले जाणार आहेत.