कोरोना काळात कर्मचाऱ्यांचं Work from Homeलाच प्राधान्य
एका सर्वेक्षणात सामिल, 74 टक्के लोकांनी घरातूनच काम सुरु ठेवण्याबाबत समर्थन दिलं
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढतो आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 54 लाखांवर पोहचला आहे. कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं. मात्र कोलमडलेली आर्थिती स्थिती पाहता, ती पुन्हा रुळावर आणण्यासाठी आता अनलॉक लागू करण्यात आलं आहे. अनलॉक 4.0 मध्ये हळू-हळू अनेक बाबी सुरु करण्यात आल्या आहेत.
अनलॉक 4.0 मध्ये बससेवा, ट्रेन, यांसारख्या सरकारी वाहतूकी दरम्यान चाकरमान्यांची होणारी मोठी गर्दी पाहता, कोरोनाचा धोका आणखी वाढत असल्याचं चित्र आहे. कोविड-19चा वाढता धोका पाहता अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होमला (Work from Home) प्राधान्य देत आहेत.
असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (Assocham) आणि कंसल्टिंग फर्म प्रायमस पार्टनर्स (Primus Partners) यांच्या एका सर्वेक्षणात सामिल, 74 टक्के लोकांनी घरातूनच काम सुरु ठेवण्याबाबत समर्थन दिलं असून वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं आहे.
Assocham आणि Primus Partners यांनी हे सर्वेक्षण देशातील आठ मट्रो आणि मोठ्या शहरांतून केलं आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद आणि पुणे या शहरात हा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार, तीन चतुर्थांश लोकांनी वर्क फ्रॉम होम किंवा फ्लेक्सिबल वर्किंग अवर्स (flexible working hours) यांसारख्या सुविधांना प्राधान्य दिलं आहे.
रिपोर्टनुसार, लॉकडाऊन दरम्यान 79 टक्के कर्मचाऱ्यांनी घरात राहूनच ऑफिसचं काम पूर्ण केलं आहे. तसंच आता अनलॉक सुरु झाल्यानंतरही 74 टक्के लोकांनी वर्क फ्रॉम होमलाच समर्थन दिलं असून घरातूनच काम करण्याच्या बाजूने आपलं मत दिलं आहे.