नवी दिल्ली: येत्या दिवाळीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची भेट मिळणार आहे. यामध्ये वेतनवाढीबरोबरच इतर अनेक फायदे कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या वेतन आयोगात एलटीसीअंतर्गत कर्मचाऱ्यांना परदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल. बराच काळ विचार केल्यानंतर सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी निवडणुकांच्या तोंडावर नोकरदार वर्गाला खूश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. मात्र, कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या विदेश यात्रेच्या या पर्यायात सरकारचा छुपा हेतू असल्याचीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. कारण, कर्मचाऱ्यांनी कोणत्या देशात फिरायला जावे, हा निर्णय सरकारचा असेल. 


सरकारी कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसोबत एखाद्या देशात जातील तेव्हा द्विपक्षीय संबंधांना चालना मिळेल. ५० लाख कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. विदेशवारीसाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी व बिनाव्याज आगाऊ उचल घेता येईल. आतापर्यंत केवळ देशातंर्गत प्रवासासाठीच हा पर्याय उपलब्ध होता. 


दैनंदिन भत्ता मिळणार नाही
केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता एलटीसी अंतर्गत दैनंदिन भत्ता मिळणार नाही. कारण या पर्यायातंर्गत कर्मचाऱ्यांना तिकीटाचे पैसे परत मिळतात. मात्र, आता देशांतर्गत प्रवास किंवा आयत्यावेळी केलेल्या खर्चाची रक्कम कर्मचाऱ्यांना परत मिळणार नाही. याशिवाय, प्रीमिअम आणि तात्काळ रेल्वे प्रवासाचाही एलटीसीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 


या देशांमध्ये करता येणार प्रवास
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान या आशियाई देशांमधील विदेशवारीला प्राधान्य देण्यात येईल. या माध्यमातून आशियाई देशांमध्ये भारताचे विशिष्ट स्थान निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.