नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या लढाईमध्ये भारताला मोठं यश मिळालं आहे. देशातली ९ राज्य आणि केंद्र शासित प्रदेश कोरोना संक्रमणातून मुक्त झाले आहेत. देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २६,९१७ एवढी झाली आहे. कोरोनामुळे ८२६ जणांना जीव गमवावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्रिपुरा, गोवा, अरुणाचल प्रदेश, मणीपूर, नागालँड, सिक्कीम, दीव-दमण, दादरा नगर हवेली आणि लक्षद्वीप हे भाग कोरोनामुक्त झाले आहे. या भागामध्ये आता कोरोनाचा एकही रुग्ण नाही. जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचा मृत्यूदर कमी असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन म्हणाले. भारतामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचं प्रमाण ३.१ टक्के आहे, तर जगात हे प्रमाण ७ टक्के आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.


भारतामध्ये कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर पडलेल्यांचं प्रमाण २२ टक्के झालं आहे, हेदेखील इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन यांनी दिली. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट व्हायचा वेगही कमी आहे. सध्या हे प्रमाण १०.५ दिवस एवढं आहे. 


लॉकडाऊनमुळे संक्रमण रोखायला मदत झाली आहे. कंटेनमेंट झोन बनवल्यामुळे मदत झाली आहे. देशात २८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तर ६४ जिल्ह्यांमध्ये मागच्या ७ दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. 


४८ जिल्ह्यांमध्ये मागच्या १४ दिवसात कोरोनाचा नवा रुग्ण सापडला नाही. तर ३३ जिल्ह्यांमध्ये २१ दिवसात कोरोना रुग्ण मिळाला नाही. १८ जिल्ह्यांमध्ये २८ दिवसांमध्ये एकही रुग्ण झाला नाही. देशात १०६ उत्पादक पीपीई किट्स बनवत आहेत. तर १० उत्पादक एन-९५ मास्कची निर्मिती करत आहेत, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.


देशामध्ये ९ उत्पादक ५९ हजार व्हॅन्टिलेटर तयार करत आहेत. एकूण रुग्णांच्या २.१७ टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे, तर १.२९ टक्के रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे. ०.३६ टक्के रुग्णांना व्हॅन्टिलेटरची गरज पडली आहे, असं हर्षवर्धनने सांगितलं.