वयाच्या ९८ व्या वर्षी हे आजोबा झाले एम. ए....
माणूस हा सातत्याने शिकत असतो, असे म्हटले जाते.
नवी दिल्ली : माणूस हा सातत्याने शिकत असतो, असे म्हटले जाते. पण शैक्षणिक शिक्षणाचा टप्पा एका ठराविक वयात संपतो. पण याला अपवाद असतात. अशीच एक अनोखी प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे एका ९८ वर्षाच्या आजोबांनी अर्थशास्त्रातील एम.एची पदवी घेतली आहे. राजकुमार वैश्य असे या गृहस्थांचे नाव आहे. त्यांच्या इच्छाशक्ती आणि जिद्दीला सलाम.
स्वप्न साकारले
इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच राजकुमार यांनी २ वर्षात ही पदवी संपादन केली आहे. त्यांचे वय पाहून त्यांना परिक्षेसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या. मात्र राजकुमार यांनी त्या नाकारत मी इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा देणार असल्याचे सांगितले.
परीक्षा देण्याबाबत राजकुमार म्हणतात, कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाचे बंधन नसते. पदव्युत्तर पदवी घेऊन मी माझे स्वप्न साकारले आहे. प्रत्येकाने सतत प्रयत्नशील असायला हवे असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला.
राजकुमार यांच्याबद्दल थोडं....
१९२० साली उत्तरप्रदेशातील बरेली येथे त्यांचा जन्म झाली. १९३४ मध्ये त्यांनी दहावीची परिक्षा दिली. त्यानंतर १९३८ मध्ये बी.ए. पूर्ण केले. त्यानंतर बिहारमधील एका कंपनीत नोकरी केली. सध्या ते पटणा येथे राहतात. आपले स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी वयाचे बंधन न मानून ५० टक्के गुण मिळवत एम.ए इन इकॉनॉमिक्स ही पदवी संपादन केली. सध्या ते अर्थशास्त्रावर एक पुस्तकही लिहीत आहेत. आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून गरीबी कमी करण्यासाठी उपाय सुचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.