बंगळुरु : सध्या सेल्फीचं वेड तरुणांमध्ये इतकं भिनलं आहे की आपल्या आजुबाजूला काय सुरु आहे याचं त्यांना भानही नसतं. असाच एक विचित्र अपघात बंगळुरुमध्ये घडला आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांसोबत पिकनिकसाठी गेलेल्या एका १७ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाचं नाव विश्वास असं होतं. धक्कादायक म्हणजे ज्यावेळी विश्वास बुडत होता त्याचवेळी त्याचे इतर मित्र सेल्फी काढण्यात मग्न होते.


विश्वास आपल्या कॉलेजच्या मित्रांसोबत पिकनिकसाठी गेला होता. त्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेसंदर्भात एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्ही तलावात आंघोळ केल्यानंतर जवळच असलेल्या एका मंदिरात गेलो. त्यावेळी आमच्या लक्षात आलं की, विश्वास आमच्यासोबत नाहीये. त्यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरु झाली.



याच दरम्यान एका विद्यार्थ्याने काढलेले फोटो पाहत असताना एका सेल्फीत विश्वास बुडत असल्याचं दिसलं. त्यामुळे एनसीसीच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही तलावाजवळ पोहोचले. मात्र, तोपर्यंत विश्वासचा मृत्यू झाला होता.


या घटनेनंतर विश्वासच्या नातेवाईकांनी कॉलेज प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तर, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.