Car Accident CCTV: उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये एक धक्कादायक अपघात कॅमेरात कैद झाला आहे. या अपघातामध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवाऱ्या मध्यरात्रीनंतर झाला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करुन घेतला आहे. एका वळणाला कारचा वेग इतका जास्त होता की ती रस्त्याच्या मध्यभाग असलेल्या डिव्हायरवरील खांबाला धडकली. धडक एवढ्या जोरात बसली ही हा खांबही रस्त्यावर पडला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी आणि रविवारदरम्यानच्या रात्री विपुलखंड येथील गोमतीनगर परिसरामधील अंबेडकर चौकामध्ये हा अपघात झाला. हा संपूर्ण घटनाक्रम या चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. या व्हिडीओमध्ये एक कार वळण असलेल्या रस्त्यावरुन अत्यंत वेगाने येताना दिसते. UP 32 FL 1105 क्रमांकाच्या या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती वळणाजवळ डिव्हायडरला धडकते. खरं तर वळण घेताना कारचा वेग कमी करणं अपेक्षित होतं. मात्र असं घडलं नाही. गाडी चालवणाऱ्या 23 वर्षीय चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. ही कार अत्यंत वेगात डिव्हायडरला धडकून पलटते. कार एवढ्या वेगात असते की धडक झाल्यानंतर निर्माण झालेल्या आगीच्या ठिणग्याही व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. 


वाढदिवसाची पार्टी करुन परत येताना अपघात


या अपघातामध्ये निराला नगर येथे राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या कारमध्ये हा तरुण एकटाच प्रवास करत होता. समोर आलेल्या माहितीनुसार, हा तरुण त्याच्या वाढदिवसाची पार्टी करुन घरी परत येत असताना रात्री अडीचच्या सुमारास हा अपघात घडला.



घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार लखनऊ महानगरपालिकेच्या झोन-4 च्या टीमने रस्त्यावर पडलेला पोल बाजूला केला. पोलिसांनी ही अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा पंचनामा सुरु आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, या तरुणाने मद्यप्राशन केलं होतं का यासंदर्भातील तपासही पोलीस करत आहेत.