VIDEO: आधी SUV ला धडकला, नंतर टेम्पोने उडवलं; बाईकचा इतका भयानक अपघात तुम्ही पाहिला नसेल
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) दिलेल्या माहितीनुसार, भारतात 2022 मध्ये 4.6 लाख रस्ते अपघातांची नोंद झाली आहे.
गुजरातच्या वडोदरामध्ये दुचाकीस्वाराचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. 23 वर्षीय दुचाकीस्वार आधी एसयुव्हीला धडकला आणि नंतर पिक-अप व्हॅनने त्याला उडवलं. वाघोडिया शहरात हा अपघात झाला आहे. तेथील सीसीटीव्हीमद्ये हा अपघात कैद झाला आहे.
सीसीटीव्हीत दिसत आहे की, महिंद्रा एसयुव्हीने यु-टर्न घेण्यासाठी वेग कमी केला होता. पण यु-टर्न घेताना त्याने इंडिकेटर दिलं होतं की नाही हे स्पष्ट दिसत नाही आहे. दरम्यान कार यु-टर्न घेत असतानाच मागून भरधाव वेगात येणारी दुचाकी तिला धडकते. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वार थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकला जातो. दुर्दैव म्हणजे त्याचवेळी जाणाऱ्या पिक-अप व्हॅनच्या खाली तो येतो. दुचाकीस्वार पिक-अप व्हॅनला जाऊन धडकल्यानंतर त्याच्यासह फरफटत जातो. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
मेहुल असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याचे वडील प्रवीण तडवी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय मेहुल वाघोडिया जीआयडीसीमध्ये काम करत होता. त्याने सहा महिन्यांपूर्वीच बाईक विकत घेतली होती. त्या दिवशी सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडला होता. संध्याकाळी वडिलांनी मेहुलला फोन करुन घरात खाण्यासाठी काही अन्न नसल्याचं सांगितलं होतं. त्यांनी मेहुलला रेस्तराँमधून पार्सल घेत ते घरी आणण्यास सांगितलं होतं. तो पार्सल घेऊन जात असतानाच रस्त्यात अपघात झाला. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
गेल्या वर्षीच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार, 2022 मध्ये भारतात 4.6 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले. या अपघातांमध्ये 1.68 लाख लोकांचा मृत्यू झाला आणि 4.43 लाख लोक जखमी झाले. 2022 च्या अहवालात मागील वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये 11.9 टक्के आणि मृत्यूंमध्ये 9.4 टक्के वाढ झाली आहे.