गेंड्याने दुचाकीस्वाराचा पाठलाग करुन त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 37 वर्षीय तरुण दुचाकीवरून जात असताना पोबितोरा वन्यजीव अभयारण्याजवळ (Pobitora Wildlife Sanctuary) गेंड्याने (Rhino) त्याच्यावर हल्ला केला. सद्दाम हुसेन असं या तरुणाचं नाव आहे. आसाम जिल्ह्यात घटनेच्या ठिकाणापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या कामरूप मेट्रोपॉलिटन जिल्ह्यात तो वास्तव्यास होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

37 वर्षीय सद्दाम हुसेन आपल्या दुचाकीवरुन प्रवास करत होता. याचवेळी अभयारण्यातून गेंडा बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याने सद्दामचा पाठलाग सुरु केला. यावेळी पाठलाग करत त्याने सद्दाम हुसेनला ठार केलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, गेंडा आपल्या दिशेने धावत येत असल्याचं दिसताच सद्दाम बाईकवरुन उतरून बाजूला असणाऱ्या खुल्या शेतात धावत सुटतो. यावेळी गेंडाही त्याच्या पाठलाग करतो. ताशी 55 किमी वेगाने धावू शकणारा गेंडा यानंतर सद्दामला पकडतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. 



गेंडा सद्दामवर हल्ला करत असताना स्थानिकांनी तिथे गर्दी केली होती. यादरम्यान ते गेंड्याला पळवून लावण्यासाठी आरडाओरड करताना दिसत आहेत. यानंतर काही वेळाने त्याचा मृतदेह आढळला. गेंड्याने त्याचं डोकं चिरडलं होतं. तुमच्या माहितीसाठी, गेंड्याचं वजन 2800 किलो असतं. गेंडा अभयारण्यातून बाहेर आला होता. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत अशी माहिती वन कर्मचाऱ्याने दिली आहे. 


आसामची राजधानी गुवाहाटीच्या उपनगरात स्थित, पोबितोरा वन्यजीव अभयारण्य हे देशातील सर्वाधिक घनतेचे एक शिंगे असलेल्या गेंड्यांसाठी ओळखले जाते. या महिन्यात जागतिक गेंडा दिनानिमित्त जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एक शिंगे असलेल्या आशियाई गेंड्यांची संख्या गेल्या चार दशकांमध्ये जवळपास तिप्पट झाली आहे. चार दशकांपूर्वी प्राण्यांची संख्या 1,500 वरून आता 4,000 पेक्षा जास्त झाली आहे.


एक प्रौढ भारतीय गेंडा सुमारे 50 वर्षे जगू शकतो. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जगातील अंदाजे 80 टक्के एक शिंगे असलेल्या गेंड्यांचा निवास आहे.