उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये रील बनवणाऱ्या तरुणाचं मुंडकं त्याच्या शरीरापासून वेगळं झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रील बनवताना तरुण स्लो मोशनमध्ये एका गाण्यावर डान्स करत होता. यावेळी त्याने खाली लावण्यात आलेली लोखंडी जाळी उचलली आणि त्याचवेळी तोल जाऊन तो खाली पडला. तरुण खाली पडल्यानंतर ती जाळी त्याच्या डोक्यावर आदळली. यावेळी त्याचं मुंडकं वेगळं झालं. गळाच कापला गेल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ फक्त 35 सेकंदाचा आहे. व्हिडीओत एकूण 5 तरुण दिसत आहेत. यामधील दोन तरुण खाली बसलेले आहेत. दुसरा तरुण शटर उघडण्याची तयारी करत असून, एकजण मागे उभा असतो. यावेळी एक तरुण तिथे स्लो मोशनमध्ये डान्स करत असतो.


तोल गेल्याने खाली पडला


व्हिडीओ पाहिल्यानंतर तरुण रील बनवत असल्याचं वाटत आहे. तो स्लो मोशनमध्ये डान्स करत असतो. त्याच्या मनात अचानक काय येतं माहिती नाही, पण तो खाली लावण्यात आलेली लोखंडाची जाळी उचलतो. पण ती उचलताच त्याचा तोल जातो आणि पाय घसरुन खाली पडतो. यावेळी तिथे उपस्थित सर्वजण त्याच्या दिशेने धाव घेतात, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. तरुणाचं जाळीत अडकल्याने डोकं शरीरापासून वेगळं होतं. तरुण चौथ्या माळ्यावरुन खालच्या माळ्यावर जाऊन कोसळतो. या दुर्घटनेनंतर तिसऱ्या माळ्यावर रक्ताचा सडा दिसत होता. घटनेची माहिती मिळतात तिथे सर्वांनी गर्दी केली होती. 



ज्वेलर्सच्या दुकानात करत होता काम


मिळालेल्या माहितीनुसार, सर्व तरुण शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दुकान सुरु करण्यासाठी आले होते. मृत तरुणाचं नाव आसिफ असून तो फक्त 20 वर्षांचा होता. तो आबाद नगरमध्ये वास्तव्यास होता. आसिफ ज्वेलर्सच्या दुकानात काम करायचा. 


पोलीस अधीक्षक आनंद कुमार पांडे यांनी सांगितलं की, कोतवाली पोलिसांना आसिफ नावाचा एक तरुण जो सराफा बाजारात काम करत होता तो सकाळी 10 च्या सुमारास चौथ्या माळ्यावरुन तिसऱ्या माळ्यावर पडला असल्याची माहिती मिळाली. त्याचा मालक त्याला घेऊन तात्काळ रुग्णालयात गेला होता. पण त्याला मृत घोषित करण्यात आलं. आसिफचे नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले होते. त्याचा मृतदेह घेऊन ते निघून गेले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही.