गेल्या काही वर्षात आणि खासकरुन लॉकडाउनपासून सोशल मीडिया हे फक्त मनोरंजन नव्हे तर कमाईचंही साधन झालं आहे. सोशल मीडियावर अकाऊंट असणारा प्रत्येकजण एखादी तरी रील करतच असतो. या रीलने अनेकांना वेड लावलं आहे. यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. हे रील शूट करण्याच्या नादात अनेकदा ही तरुणाई आपला जीव धोक्यात घालताना दिसते. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे रीलच्या नादात एका 16 वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला आहे. ट्रेनच्या रुळावर शूट करत असतानाच त्याला ट्रेनने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, त्याच्या शरिराचे अक्षरश: तुकडे झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी आक्रोश सुरु केला. पोलीस तरुणाच्या मित्रांची चौकशी करत आहे. दरम्यान, तरुणाचा मृत्यूच्या काही सेकंद आधी शूट केलेला व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. 



जहांगीराबादमधील दौलतपुरा गावात मुन्ना यांच्या सलून आहे. त्यांचा 16 वर्षीय मुलगा फरमान गुरुवारी आपले तीन मित्र शोएब, नादिर आणि समीर यांच्यासह बारावफातचा जुलूस पाहण्यासाठी शाहपूर येथे चालला होता. यादरम्यान दामोदरपूर गावाजवळ रेल्वे क्रॉसिंगवर रील बनवण्यासाठी तो गेला. त्याचा एक मित्र रील शूट करत होता. 


दरभंगावरुन येणाऱ्या ट्रेनने दिली धडक


फरमानने मित्राला स्लो मोशनमध्ये रील शूट करण्यास सांगितलं. यानंतर तो रुळाच्या शेजारी चालू लागला. फरहान रुळाच्या शेजारी चालताना 7 सेकंदही झाले नसतील तोवर दरभंगावरुन येणाऱ्या ट्रेनने त्याला धडक दिली. ट्रेन इतक्या वेगात होती की क्षणात फरमान खाली कोसळला आणि शरिराचे तुकडे झाले. यानंतर त्याच्या मित्रांची धावपळ सुरु झाली. काही क्षण त्यांना काय झालं हे कळलंच नाही. मित्राच्या मोबाईलमध्ये फरमानच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे.