Accident News: जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस 'वैष्णोदेवी'ला जात असताना ही अपघात झाला. प्रवासी देवदर्शनासाठी जात असताना बस पुलावरुन थेट दरीत कोसळल्याने 10 जण ठार झाले असून, 55 प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील काही जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बस अमृतसर येथून आली होती. ही बस अमृतसरहून जात असताना जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रियासी जिल्ह्यातील कटराजवळ झज्जर कोटली परिसरात आली असता ही दुर्घटना घडली. कटरा येथे वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी बेस कॅम्प आहे. 


बसमधील अधिक प्रवासी बिहारमधील होते. पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वैष्णोदेवीला जात होते. "10 लोकांचा मृत्यू झाला असून, 55 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि केंद्रीय दलांसह स्थानिकांनी बचावकार्यात मदत केली," अशी माहिती जम्मूचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक चंदन कोहली यांनी दिली आहे.



बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होती. अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात असून, गर्दी हादेखील तपासाचा भाग असेल असं ते म्हणाले आहेत. 


जम्मू आणि काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं आहे की, बस वेगाने धावत असल्याने ते अपघाताला कारणीभूत ठरलं असावं. याप्ररकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.  जखमींवर जम्मूमधील सरकारी मेडिकल कॉलेजात उपचार सुरु आहेत. 


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली असून शोक व्यक्त केला आहे. तसंच जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. 


"जम्मूमधील बस दुर्घटनेत अनेक यात्रेकरूंचा मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना," असं त्यांनी म्हटलं आहे.