Chhattisgarh Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) आपले रिल व्हायरल व्हावेत यासाठी तरुण अनेकदा आपला जीव धोक्यात टाकत असतात. इन्स्टाग्रामला (Instagram) असे अनेक रील तुमच्याही पाहण्यात येत असतील. दरम्यान, अशाच प्रकारे रिल बनवण्याच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिलासपूरमधील (Bilaspur) हा तरुण इमारतीवर एका छतावरुन दुसऱ्या छतावर उडी मारत असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान तरुणाच्या मृत्यूच्या काही सेकंद आधीचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवीशंकर साहू असं या तरुणाचं नाव आहे. शुक्रवारी रवीशंकर आपल्या मित्रांसह कॉलेजात गेला होता. दुपारी इन्स्टाग्राम रील तयार करण्यासाठी तो इमारतीच्या छतावर चढला. यावेळी त्याने मित्रांना व्हिडीओ शूट करण्यास सांगितलं. आपण एका छतावरुन दुसऱ्या छतावर उडी मारणार असल्याचं त्याने सांगितलं. काही वेळात त्याने उडी मारली पण पाय घसरल्यामुळे खाली पडला. उंचावरुन खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 


मृत्यूच्या काही सेकंद आधीचा व्हिडीओ व्हायरल


तरुणाच्या मृत्यू काही सेकंदआधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ रवीशंकर भगव्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. त्याचे मित्र छतावर उभे असताना तो बाहेरच्या बाजूला उभा आहे. 17 सेकंदाच्या या व्हिडीओत तो जोखीम घेत धोकादायक ठिकाणी उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी त्याचे मित्र बिनधास्त उडी मार, तुझ्या वजनाने हे तुटणार नाही असं मस्करीत सांगताना ऐकू येत आहे. रवीशंकपासून काही अंतरावर आणखी एक छोटी भिंत होती. तिच्यावरच उडी मारताना तो खाली कोसळतो. 



रवीशंकरचा मित्र रोशन याने संपूर्ण घटनाक्रम सांगितलं आहे. त्याने सांगितलं की, आम्ही इमारतीच्या छतावर होतो. त्याने आम्हाला व्हिडीओ शूट करण्यास सांगितलं. आपण एका छतावरुन दुसऱ्या छतावर उडी मारत असल्याचं त्याने सांगितलं. पण त्याने उडी मारताच पाय घसरला आणि खाली जाऊन पडला. यानंतर आम्ही धावत खाली गेलो आणि रुग्णवाहिकेला फोन केला. आम्ही शिक्षकांनाही याची माहिती दिली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलासपूरच्या सायन्स कॉलेजमध्ये ही घटना घडली. तरुण हा जांजगीर चांपाचा रहिवासी आहे. तो इंस्टाग्राम रिल्स बनवण्यासाठी छतावर चढला होता. खाली पडल्यानंतर डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कुटुंबीय आणि मित्रांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.