Viral Video: सध्याच्या सोशल मीडियाच्या (Social Media) जमान्यात प्रत्येकालाच आपणही रील (Reel) शूट करावं आणि ते शेअर करावं असं वाटतं. आपलंही एखादं रील व्हायरल (Viral) व्हावं आणि प्रसिद्धी मिळावी अशी त्यांची इच्छा असते. अनेकदा तर कर्मचारी कामावर असतानाही रील शूट करतात. यानंतर त्यांच्यावर कारवाई झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, कारवाई झालेल्यांच्या या यादीत एका पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश झाला आहे. खाकीत बाईकवर रील शूट करणं या पोलीस कॉन्स्टेबलला चांगलंच महागात पडलं. यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश पोलिसांनी एक परिपत्रक जारी केलं आहे. यानुसार, पोलीस खात्याशी संबंधित कोणताही अधिकारी किंवा कॉन्स्टेबल सोशल मीडियावर काही पोस्ट करु शकत नाही. पण यानंतर अनेक कर्मचारी या आदेशाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यातच एका कॉन्स्टेबलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबलने बाईकवर स्टंट करत रील शूट केलं आहे. इतकंच नाही तर त्याने ते सोशल मीडियावरही पोस्ट केलं. पण या रीलमुळे कर्मचाऱ्याला आपली नोकरी गमवावी लागली आहे. एसएसपी डॉक्टर गौरव ग्रोव्हर यांनी कॉन्स्टेबलला तात्काळ स्वरुपात निलंबित केलं आहे. 


व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव संदीप कुमार चौहान असं आहे. एका ऑडिओवर हा रील शूट करण्यात आला आहे. या ऑडिओत मुलगी विचारते, 'तुला तुझ्या शत्रूंची भीती वाटत नाही का?' त्यावर उत्त मिळतं 'शत्रूंना काय घाबरायचं...मृत्यूचं काय, आज नाहीतर उद्या मरायचंच आहे. आणि घाबरायचं असेल तर देवाला घाबरा, या किड्यांना काय घाबरायचं'.


हा व्हिडीओ शूट केल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल संदीप कुमार चौहान याने तो सोशल मीडियावर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडीओ चर्चेत आला होता. यामुळे अखेर पोलीस खात्यानेही या व्हिडीओची दखल घेतली. एसएसपी गौरव ग्रोव्हर यांनी पोलीस कॉन्स्टेबल संदीप कुमार चौहान याला निलंबित केलं आहे. 


कारवाईची माहिती देताना त्यांनी सांगितलं की "उत्तर प्रदेश पोलिसांवर कोणताही खासगी फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची बंदी आहे. यासाठी 8 फेब्रुवारी 2023 रोजी पोलीस मुख्यालयाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. पण यानंतर कॉन्स्टेबलने खात्याच्या आदेशाचं उल्लंघन करत व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामुळे नियमाचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळे कॉन्स्टेबल संदीप कुमार चौहान याला निलंबित करण्यात आलं आहे".