आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या पत्नीला रोखण्यासाठी पोहोचलेल्या पतीलाही जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ट्रेनने धडक दिल्याने दांपत्य जागीच ठार झालं. दांपत्याच्या मृत्यूमुळे त्यांची तिन्ही मुलं एका क्षणात पोरकी झाली आहेत. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील पंचकोशी रेल्वे क्रॉसिंगवर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीला दारुचं व्यसन होतं. यामुळे कंटाळलेल्या पत्नीने आपला जीव संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता. यानंतर पत्नी जीव देण्यासाठी पंचकोशी रेल्वे क्रॉसिंगवर पोहोचली होती. पत्नीला जीव देण्यापासून रोखण्यासाठी पतीही तिच्या मागून तिथे पोहोचला होता. पत्नीला शांत करण्यासाठी त्याने तिला मिठी मारत समजावण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी ट्रॅकवरुन आलेल्या ट्रेनने दोघांना धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 


सारनाथ पोलीस स्थानकाचे स्टेशन हाऊस अधइकारी ब्रिजेश कुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय गोविंद सोनकर हा दारुच्या आहारी गेला होता. बुधवारी रात्रीही तो दारु पित होता. यावेळी त्याची 28 वर्षीय पत्नी खुशबू सोनकरने त्याला विरोध केला.


एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, गोविंद हा पूर्णपणे दारुच्या नशेत होता. त्याला अजिबात शुद्ध नव्हती. पत्नीने दारु पिण्यास विरोध केल्याने त्याने तिच्याशी वाद घातला. यानंतर पत्नी जीव देण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेली. गोविंदही पत्नीच्या मागे गेला आणि तिची समजूत काढू लागला. त्याने रेल्वे ट्रॅकवर उभ्या पत्नीला मिठी मारुन आत्महत्येपासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण ट्रॅकवरुन वेगाने ट्रेन येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही आणि धडकेत दोघे ठार झाले. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांपत्याच्या मागे तीन मुलं आहेत. मुलगा सहा वर्षांचा आहे. तर दोन मुली असून 3 आणि 4 वर्षांच्या आहेत. गोविंद हा फळविक्रेता होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.