उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सापाच्या दंशामुळे मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाने तरुणाच्या मृतदेहाला दोरीला बांधून गंगा नदीत लटकवलं होतं. याचं कारण त्यांना असं केल्याने तरुण पुन्हा जिवंत होईल असं वाटत होतं. बराच वेळ झाल्यानंतरही तरुणाच्या शरिरात कोणतीही हालचाल होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंधश्रद्धेची परिसीमा गाठणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रशासनाने मात्र अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

26 एप्रिलला 20 वर्षीय मोहितचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. यादरम्यान तरुण पुन्हा जिवंत व्हावा यासाठी कुटुंबाने अंधश्रद्धेचा आधार घेतला. कुटुंबीय आणि ग्रामस्थ मृतदेह घेऊन गंगा नदीच्या किनारी पुलावर पोहोचले. जर मृतदेह गंगेच्या पाण्यात ठेवला तर सापाच्या विषाचा परिणाम होत नाही आणि तरुण पुन्हा जिवंत होऊ शकतो असं कोणीतरी त्यांना सांगितलं होतं. 


अशा स्थितीत मोहितच्या मृतदेहाला दोरीला बांधून गंगा नदीत लटकवण्यात आलं. मृतदेह नदीतील पाण्यात बराच वेळ तरंगत होता. यादरम्यान तिथे हजारो लोकांनी गर्दी केली होती. पण मोहित कोणतीही हालचाल करत नसल्याचं लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी नदीकिनारी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. उपस्थितांपैकी एकाने या घटनेचा व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर व्हायरल केला. तेव्हापासून या अजब घटनेची चर्चा रंगली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आहार पोलीस स्टेशन क्षेत्राच्या जयरामपूर कुदैना गावात ही घटना घडली आहे. 26 एप्रिलला येथे एका तरुणाचा मृतदेह गंगा नदीत लटकवण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. जिवंत होण्याची भाबडी आशा आणि अंधविश्वास यातून त्यांनी हे कृत्य केलं होतं. 


ग्रामस्थांनी मोहितला घटनेच्या दिवशी आपल्या शेतात पाहिलं होतं. तिथेच सापाने त्याला दंश केला होता. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तिथे काही मदत मिळाली नाही. यानंतर त्याला दुसऱ्या डॉक्टरांकडे नेण्यात आलं. पण तरीही काही फायदा झाला नाही. यानंतर काही लोकांच्या सल्ल्यानंतर गंगा नदीच्या किनारी नेत त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना सद्या चांगलीच चर्चेत असून, आजही लोक इतक्या मोठ्या प्रमाणात अंधविश्वास ठेवत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.