रस्त्यावर वाहन चालवताना एक चूक आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालते. त्यामुळेच वाहन चालवताना योग्य खबरदारी घेणं आपल्यासह इतरांच्याही हिताचं असतं. जर रस्त्यावर, हायवेवर वाहन चालवताना योग्य काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं हे नुकतंच राजस्थानमधील एका घटनेने समोर आणलं आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर ट्रकचालकाने यु-टर्न घेतल्याने कारचा अपघात होऊन 6 जण ठार झाले आहेत. राजस्थानमध्ये हा अपघात झाला असून, वेगात असणाऱ्या कारने ट्रकला धडक दिली. पोलिसांनी अपघातानंतर ट्रक ताब्यात घेतला आहे. दरम्यान ट्रकचालक मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार, कार मागून वेगाने येत असताना समोरुन जाणाऱ्या ट्रकने यु-टर्न घेतला. यानंतर कार थेट जाऊन ट्रकवर आदळली. 


राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. कुटुंब सीकर जिल्ह्यातून रणथंबोरच्या त्रिनेत्र गणेश मंदिराकडे जात निघालं होतं. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि उपमुख्यमंत्री दिव्या कुमारी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. 


"दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर सवाई माधोपूर जिल्ह्यातील बाउली पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातात 6 नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत," अशी माहिती भजनलाल शर्मा यांनी एक्सवरुन दिली आहेत. 


दरम्यान उपमुख्यमंत्री दिव्या कुमार यांनी शोक व्यक्त करत म्हटलं आहे की, "सवाई माधोपूरच्या बाउली पोलीस स्टेशन परिसरात एका भीषण रस्ता अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी मिळाली". अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. दरम्यान ट्रकचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.