Viral Video: ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना जीव धोक्यात घालू नका असं आवाहन वारंवार रेल्वेकडून केलं जात असतं. पण त्यानंतरही अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालत असतात. आरपीएफ जवान अनेकदा अशावेळी प्रसंगावधान दाखवत अशा प्रवाशांचा जीव वाचवत असतात. या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतात. पण राजस्थानच्या एका पित्याला वाचवण्यासाठी कोणतीही संधी तेथील प्रवासी किंवा आरपीएफ जवानांना मिळाली नाही. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात तोल गेल्याने एका बापाला आणि मुलीला जीव गमवावा लागला आहे. ही घटना सीसीटीव्ही (CCTV) कैद झाली असून, व्हिडीओ पाहून नेटकरी हळहळ व्यक्त करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

AC लोकलने धडक दिल्यानंतर तरुण अक्षरश: हवेत उडाला; मालाड स्थानकावरील अंगावर काटा आणणारा VIDEO


 


राजस्थानमध्ये (Rajasthan) ही धक्कादायक घटना घडली आहे. आबूरोड रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेत वडिलांचा आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. धावती ट्रेन पकडत असतानाच पाय घसरल्याने वडील आपल्या मुलीसह ट्रेनच्या खाली गेले. यानंतर ट्रेन थांबवण्यात आली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. वडील आणि मुलगी ट्रेनखाली आल्याने गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कैद झाली असून, त्यानंतर घटना उघडकीस आली आहे. 


नेमकं काय झालं?


रविवारी आहोर तालुक्याच्या भैसावाडा येथील निवासी भीमाराम आपल्या कुटुंबासह घरी चालले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, 36 वर्षीय भीमाराम आबूरोड रेल्वे स्थानकावरुन साबरमती-जोधपूर ट्रेनने फालना येथे चालले होते. त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुली होत्या. 


भीमाराम ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोहोचले तेव्हा ट्रेन सुटलेली होती. यामुळे त्यांनी धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. भीमाराम यांनी सर्वात आधी आपल्या मुलीला ट्रेनमध्ये चढवलं. यादरम्यान ट्रेनने वेग पकडला होता. एका मुलीला चढवल्यानंतर भीमाराम यांनी बायकोच्या हातात असणाऱ्या दुसऱ्या मुलीला घेतलं आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करु लागले. यावेळी त्यांची पत्नी मागेच राहिली होती. 



भीमाराम मुलीला हातात घेऊन ते ट्रेनमध्ये चढले आणि तितक्यात त्यांचा तोल गेला. तोल गेल्यानंतर भीमाराम मुलीसह खाली पडले आणि  ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधे असणाऱ्या अंतरातून ट्रेनखाली गेले. यानंतर स्थानकावरील प्रवाशांनी आरडाओरड सुरु केला. आरडाओरड ऐकल्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली. दरम्यान, दुसरीकडे पती आणि मुलगी ट्रेनखाली गेल्याचं पाहून त्यांची पत्नी तिथेच बेशुद्ध पडली. 


नंतर भीमाराम आणि त्यांच्या मुलीला ट्रेनखालून काढण्यात आलं. दोघेही गंभीर जखमी झाले होते. स्थानकावरील उपस्थित प्रवाशांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने भीमाराम आणि त्यांच्या मुलीला रुग्णालयात दाकल केलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. ही सर्व दुर्घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी हळहळ व्यक्त केली जात आहे.