Crime News: बाप म्हणजे कुटुंबाचा आधार असते. ज्याप्रमाणे आई कुटुंबाला वात्सल्य देते, त्याप्रमाणे बाप म्हणजे कुटुंबाचा आधारवड असतो. बाप असताना मुलांना काहीच चिंता नसतो. ऊन, वारा, पाऊस अशा सर्व संकटांना तोंड देण्यासाठी बाप सर्वात पुढे असतो. पण जेव्हा हाच बाप मुलांच्या जीवावर उठतो तेव्हा होणाऱ्या यातनाही तितक्याच जास्त असतात. नुकतीच राजस्थानमधील अशी एक घटना समोर आली आहे. एका पित्याने चक्क आपल्या मुलीलाच गहाण ठेवलं आहे. या घटनेनंतर सर्वजण संताप व्यक्त करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमध्ये बापाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका पित्याने आपल्या मुलीलाच गहाण ठेवलं. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने दारु पिण्यासाठी घेतललं कर्ज फेडण्यासाठी आपल्या चिमुरड्या लेकीला गहाण ठेवलं. जयपूरमध्ये ही घटना घडली आहे. 


जयपूरमधील हा व्यक्ती आपली पत्नी तसंच 4 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांच्या मुलासोबत राहतो. तो भंगार गोळा करण्याचं काम करतो. तसंच तो मद्याच्या आहारी गेला आहे. दारु पिण्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून उधारीवर पैसे घेतले होते. पण हे पैसे तो परत देण्यात असमर्थ ठरत होता. 


ज्याने पैसे दिले होते तो वारंवार पैसे देण्यासाठी तगादा लावला होता. यादरम्यान, पित्याने कोणी विचारही केला नसेल असं कृत्य केलं. आपल्या मुलीला तो सोबत घेऊन गेला आणि कर्ज देणाऱ्याकडे सोपवलं. हिला भीक मागायला लावा आणि तुमचे पैसे वसूल करुन घ्या. त्यानंतर तिला पुन्हा माझ्याकडे सोपवा असं त्याने सांगितलं. 


यानंतर तो मुलीला घेऊन गेला आणि भीक मागण्यास भाग पाडलं. यानंतर मुलगी रोज भीक मागून 100 रुपये घरी आणत होती. तिने आतापर्यंत वडिलांना 4500 रुपये दिले आहेत. यादरम्यान तिचा 6 वर्षांचा भाऊ तिला घेऊन कोटाला गेला. 


 कोटा येथील रेल्वे कॉलनीत दोघांना फिरताना पाहून पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांची चौकशी केली. यानंतर त्यांना बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आलं. समितीचे सदस्य अरुण भार्गव यांनी मुलांचं काऊन्सलिंग केलं असता धक्कादायक माहिती समोर आली. 


यावेळी मुलाने सांगितलं की, त्याची आई दिव्यांग असून वडिलांना दारुचं व्यसन आहे. वडिलांनी कर्ज फेडण्यासाठी आपल्या बहिणीला गहाण ठेवलं होतं. अरुण भार्गव यांनी सांगितलं की, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी, एसपी ग्रामीण आणि एसपी शहर आमच्याकडे आले होते. पोलीस यारप्रकरणी मुलीला भीक मागायला लावणाऱ्या आरोपी वडिलांवर कारवाई करणार आहे.