उत्तर प्रदेशच्या बदायूँमध्ये दोन मुलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यानंतर पोलिसांनी अटकेदरम्यान झालेल्या चकमकीत मुख्य आरोपी साजिदला ठार केलं आहे. दरम्यान मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सह-आरोपी जावेदला चकमकीत ठार करु नका अशी विनंती केली आहे. त्याने आपल्या भावासह मिळून हे निर्घृण कृत्य का केलं? याची माहिती मिळवा असं ते पोलिसांना म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साजिदने 11 वर्षांचा आयुष आणि 6 वर्षांचा आहान यांची त्यांच्याच घऱात गळा कापून हत्या केली होती. सुदैवाने त्यांचा भाऊ आणि आई या हल्ल्यातून वाचले होते. कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार, हत्येनंतर साजिदने जावेदसह घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. जावेद यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पण साजिद स्थानिकांच्या हाती लागला. स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं. पण नंतर पोलीस चकमकीत साजिद ठार मारला गेला. दरम्यान जावेदने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर केला असून आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. 


"हत्येचं कारण समजून घेण्यासाठी जावेदची चौकशी झाली पाहिजे. जर तो चकमकीत ठार मारला गेला तर सत्य कधीच बाहेर येणार नाही. यामध्ये इतर लोकही सहभागी असू शकतात. माझ्या मुलाच्या हत्येमागे नेमका काय कट होता हे समजलं पाहिजे. त्यांनी कुटुंबातील इतरांचीही हत्या केली असती." असं ते म्हणाले आहेत.


'बायको आजारी आहे, 5000 रुपये हवेत,' मदतीचा बहाणा करत शेजारच्या दोन मुलांची हत्या; पोलिसांनी केला एन्काऊंटर


 


"याप्रकरणी सविस्तर तपास झाला पाहिजे. मुलांच्या हत्येमागे नेमकं काय कारण होतं? मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे विनंती करत आहे. आम्हाला नेमकी माहिती मिळायला हवी," असं त्यांनी सांगितलं आहे.


पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर आपण समाधानी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले आहेत की, "मी पोलिसांना विनंती करत आहे की, जावेदला चकमकीत ठार करु नका जेणेकरुन रहस्याचा उलगडा होणार नाही. यामागे अन्य काहीजणही सहभागी असू शकतात". यावेळी त्यांनी आपलं कोणासोबतही शत्रुत्व नसल्याचा दावा केला.


आरोपी साजिद याचं पीडितांच्या घऱासमोर केशकर्तनालय होतं. तो मुलांचे वडील विनोद यांना ओळखत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मंगळवारी संध्याकाळी साजिद त्यांच्या घऱी गेला होता. त्याला 5 हजार रुपये उधार हवे होते. पण विनोद घरी नव्हते. विनोद यांची पत्नी चहा बनवण्यासाठी गेली असता साजिदने त्यांच्या तिन्ही मुलांवर हल्ला केला.


संगीता किचनमध्ये चहा बनवत असताना, साजिदने 11 वर्षीय मोठा मुलगा आयुशला आईचं ब्यूटी सलून दाखवण्यास सांगितलं. आयुष त्याला वरती घेऊन जात होता. दुसऱ्या माळ्यावर पोहोचताच साजिदने लाईट बंद केली आणि आयुषवर चाकूने हल्ला केला. साजिद आयुषचा गळा कापत असतानाच 6 वर्षीय अहान तिथे पोहोचला. साजिदने अहानला पकडलं आणि त्याच पद्धतीने हल्ला केला. यानंतर त्याने तिसऱ्या मुलाकडे मोर्चा वळवला. पण 7 वर्षांचा पियूष पळून जाण्यात आणि लपण्यात यशस्वी झाला असं पोलिसांनी सांगितलं आहे. 


यानंतर साजिदने आपला भाऊ जावेदसह घटनास्थळावरुन पळ काढला. जावेद घराबाहेर बाईकवर त्याची वाट पाहत थांबलेला होता. घटनेत साजिद आणि जावेद दोघेही सहभागी असल्याचा कुटुंबाचा आरोप होता.