पंतप्रधान कोण `हे` निवडणुकीनंतरच ठरवू; डाव्यांचा ठाम पवित्रा
आपण देशाच्या इतिहासातून काहीतरी शिकले पाहिजे.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी महाआघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार आत्ताच ठरवता येणार नाही. किंबहुना हा निर्णय निवडणुका झाल्यानंतर होऊ शकतो, असा पवित्रा डाव्या पक्षांनी घेतला आहे. चेन्नईत रविवारी झालेल्या कार्यक्रमात द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव सूचित केले होते. राहुल यांच्यात नरेंद्र मोदींसारख्या फॅसिस्ट नेत्याला हरवण्याची क्षमता असल्याचे यावेळी स्टॅलिन यांनी म्हटले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर स्टॅलिन यांचे हे विधान सूचक मानले जात होते. त्यामुळे महाआघाडीचे नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारणार का, अशी चर्चाही नव्याने सुरु झाली होती.
या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी सोमवारी आपल्या पक्षाची भूमिका मांडली. त्यांनी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रत्येकाचे वैयक्तिक मत वेगळे असू शकते. मात्र, आपण देशाच्या इतिहासातून काहीतरी शिकले पाहिजे. भाजपविरोधी कोणताही पर्याय अस्तित्वात यायचाच असेल तर तो लोकसभा निवडणुकीनंतर येऊ शकतो, असे येचुरी यांनी म्हटले. त्यामुळे तुर्तास डावे पक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारायला तयार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच दिल्लीत विरोध पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, एच. डी. देवेगौडा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) चेअरमन सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, डीएमकेचे नेते स्टॅलिन, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी, सीपीआयचे महासचिव एस. सुधाकर रेड्डी, नॅशनल कॉन्फरसचे प्रमुख फारुक अब्दुल्ला, काँग्रेस नेते अहमद पटेल, ए. के. अँथनी, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत आदी उपस्थित होते. मात्र, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीत सहभागी होणे टाळले होते.