Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाडीला विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीला सॅनिटाजर (sanitiser) पाजण्यात आलं आहे. यानंतर मुलीचा मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बरेलीत ही घटना घडली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय पीडितेने छेडछाडीला विरोध केला असता काही तरुणांनी तिला सॅनिटायजर पाजलं. यानंतर तिने जीव गमावला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटना उघड झाल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत आंदोलन केलं. आरोपींना अटक केली जावी अशी त्यांची मागणी होती. यानंतर दोन तासांसाठी वाहतूक ठप्प झाली होती. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 वीत शिकणारी पीडित विद्यार्थिनी शाळेतून परतत असताना आरोपींपैकी एकजण असलेल्या 21 वर्षीय उदेश राठोडने तिला रोखलं. यानंतर त्याने तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आणखी तिघेजण उदेश राठोडच्या सोबतीला आले. यानंतर त्यांनी सॅनिटायजर पाजलं  अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल भाटी यांनी दिली आहे. 


पीडित मुलीच्या भावाने मध्यस्थी करत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्याला मारहाण केली असं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काढला आणि नंतर तो सोशल मीडियावर शेअर केला. 


आरोपींनी सॅनिटायजर पाजल्यानंतर मुलीची तब्येत खराब झाली. यानंतर तिला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथून तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


पोलीस अधीक्षक राहुल भाटी यांनी सांगितलं आहे की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्यानुसार कारवाई केली जाईल.


दरम्यान मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीय संतापले आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह घऱी नेला जात असताना कुटुंबीयांनी तो खाली रस्त्यावर ठेवला आणि आंदोलन करण्यास सुरुवात केली. जवळपास दोन तास कुटुंबीय आणि नातेवाईक आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करत आंदोलन करत होते. 


पोलिांना घटनास्थळी दाखल होत कुटुंबीयांची समजूत काढली. पोलिसांनी निष्पक्ष तपास करण्याची आणि आरोपींना अटक करण्याची ग्वाही दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं. दरम्यान, आंदोलनामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची चार पथकं तयार करण्यात आली आहेत.