Crime News: गुरुग्राममध्ये (Gurugram) तरुणाने लग्न मोडल्याने संतापाच्या भरात 19 वर्षीय तरुणीची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने हत्या केल्यानंतर मुलीची आई त्याला चपलेने मारत होती. पण एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे आली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 वर्षीय आरोपीचं पीडित 19 वर्षीय तरुणीशी लग्न ठरलं होतं. याच रागात आरोपीने तरुणीला गाठलं आणि दिवसाढवळ्या सर्वांसमोर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. 


या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. यामध्ये तरुणी आपल्या आईसह चालताना दिसत आहे. यावेळी आरोपी त्यांच्या दिशेने जातो. आरोपीला येताना पाहून दोघीही जागेवर थांबतात. यानंतर आरोपी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. काही वेळ बोलणं झाल्यानंतर त्यांच्यात वाद झाला असावा असं दिसत आहे. कारण तरुणीची आई पायातून चप्पल काढत त्याच्या दिशेने जाते. 


पण यानंतर काही वेळात आरोपी चाकू काढतो आणि तरुणीवर हल्ला करतो. यावेळी तिची आई तिला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण आरोपी एकामागोमाग अनेक वेळा वार करतो. यावेळी तिथे काही लोक उपस्थित असल्याचं दिसत आहे. पण कोणीही मदतीसाठी पुढे जात नाही. याउलट पळून आपल्या घरात जातात. दरम्यान, हत्येनंतर तरुणीची आई आरोपीला पकडते. यानंतर ती सर्वांसमोर आरोपीला चपलेने मारते. यावेळी एकीकडे मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो आणि दुसरीकडे तिची आई रक्ताने माखलेल्या आरोपीला चपलेने मारत असते. यावेळीही लोक फक्त पाहत उभे असतात. 



 


आरोपीला अटक


पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि पीडित तरुणी उत्तर प्रदेशच्या बदाऊ येथील आहेत. तरुणी मोलकरीण म्हणून काम करायची. चार महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. पण काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा मोडला होता. यावरुन तरुण नाराज होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीचा मोबाइल आणि चाकू जप्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 


पोलीस उपायुक्त वरुण दहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आज सकाळी 19 वर्षाच्या तरुणीची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चाकू आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे".