Noida Accident: नोएडामधील सेक्टर 25 मध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली. एका अज्ञात वाहनाने स्कुटीवरुन जाणाऱ्या तरुणीला धडक दिली. यानंतर तरुणी हवेत उडून फ्लायओव्हरच्या मधोमध असणाऱ्या खांबावर जाऊन कोसळली आणि अडकली. यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरु झाली होती. अखेर तरुणीची सुटका करण्यात यश आलं आहे. सध्या उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातानंतर मुलीली वाचवण्यासाठो दोन लोक पुलाच्या मधोमध असणाऱ्या खांबावर उतरले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर 20 ठाणे क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या सेक्टर 25 जवळ तरुणी स्कुटीवरुन कामानिमित्त बाहेर पडली होती. यावेळी एका अज्ञात वाहनाने तरुणीच्या स्कुटीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, तरुणी हवेत उडाली आणि फ्लायओव्हरच्या मधोमध असणाऱ्या खांबावर जाऊन पडली. यानंतर ती तिथेच अडकलेली होती. 



एडीसीपी मनिष कुमार मिश्रा यांनी घटनेची माहिती देताना सांगितलं की, एक तरुण नोएडामधून गाजियाबादच्या दिशेने जात होती. तिच्या स्कुटीचा अपघात झाला आणि ती एलिव्हेटेड रोडच्या बेसवर जाऊन पडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले होते. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणीची सुरक्षित सुटका केली आहे. तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. 


तरुणीच्या बचावासाठी उतरलेल्या दोघांचीही सुटका करण्यात आली असून रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॅगनआर कारने स्कुटीला धडक दिली होती. पोलिसांनी ही कार जप्त केली आहे. पोलीस तरुणीकडे घटनेसंबंधी चौकशी करणार आहेत. यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.