Viral News: लग्नाची सर्व तयारी झाली होती. मंडप सजला होता, नातेवाईकही जमले होते. नवरदेवही आता काही वेळातच आपण लग्नाची गाठ बांधणार असल्याने भविष्यातील स्वप्न रंगवत होता. लग्नाचे विधी सुरु झाले होते. पण तितक्यात नवरीमुलीने पोटात दुखत असल्याचं आणि उलट्या होत असल्याचं सांगितलं. यामुळे सर्व नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. पण त्यानतंर जे काही झालं त्यानंतर तर सगळ्यांनाच धक्का बसला. कारण नवरीमुलीने प्रियकरासोबत पळ काढला होता. पण त्यानंतर जे काही होणार होतं ते अजूनच आश्चर्यकारक होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटदुखी आणि उलट्या होत असल्याचं सांगत नवरीमुलगी मंडपातून घरी गेली आणि तिथून आपल्या प्रियकरासोबत पळ काढला. मुलगी पळून गेल्याचं ऐकताच तिच्या वडिलांसह नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण यानंतर नवरदेव मात्र प्रचंड नाराज झाला होता. लग्नाआधी नवरीमुलगी पळून गेल्याने तो हट्टाला पेटला. त्याने जोपर्यंत मुलगी परत येत नाही तोपर्यंत आपण परत जायचं नाही असा निर्णय घेतला. तो आपल्या नातेवाईकांसह सासरी ठाण मांडून बसला होता. यानंतर जवळपास 13 दिवसांनी मुलीची माहिती मिळवत तिला परत आणण्यात आलं. यानंतर सर्व विधी करत त्यांचं लग्न लावण्यात आलं आणि पाठवणी करण्यात आली. 


राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील बाली येथील हे प्रकरण आहे. येथील सैणा गावातील सकाराम यांची मुलगी मनिषा हिचं लग्न ठरलं होतं. सिरोही जिल्ह्यातील मणादर गावातील श्रवण कुमार याच्याशी तिचा विवाह होणार होता. ठरलेल्या कार्यक्रमानुसार, श्रवण वरातींना घेऊन 3 मे रोजी सेगा गावात पोहोचला होता. येथे त्यांचंही थाटामाटात स्वागत करण्यात आलं. सर्वकाही ठरल्याप्रमाणे सुरु होतं. 


4 मे रोजी सकाळी 6.15 वाजता लग्न होणार होतं. भटजीने नवरीदेवीला मंडपात आणण्यास सांगितलं. पण तिची तब्येत बरी नाही सांगत थोडा वेळ थांबण्यास सांगण्यात आलं. तिथे नवरीमुलगी तब्येत बरी नाही सांगत घराच्या मागे असणाऱ्या टाकीजवळ पोहोचली. तिछे आधीच थांबलेल्या आपल्या चुलत भावासोबत तिने पळ काढला. बराच वेळ झाला तरी मनिषा परत न आल्याने तिच्या मावशीने जाऊन पाहिलं. तिचा शोध लागत नसल्याने सर्व नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. 


 मुलीचे वडील सकाराम यांनी सांगितलं की, लग्नाआधी मुलगी घऱात गेली होती. यावेळी पोटात दुखत असून शौचालयाच्या बहाण्याने ती गेली होती. येथे तिच्यासोबत पळून जाण्यासाठी प्रियकर आधीच थांबला होता. 


तिथे नवरामुलगा मात्र नवरीला सोबत नेण्याच्या हट्टाला पेटला होता. तो 13 दिवस सासरीच थांबला होता. नवरीमुलीच्या प्रतिक्षेत त्याने डोक्यावरचा फेटाही काढला नव्हता. घरासमोर सजलेला मंडपही तसाच होता. अखेर शोध लावून 15 मे रोजी तिला घऱी आणण्यात आलं. यानंतर तिचं लग्न लावून नवरदेवासोबत पाठवण्यात आलं.