Viral News: जयपूरमधील (Jaipur) कौटुंबिक न्यायालयात (Family Court) एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. झालं असं की, हुंड्यासाठी छळ केल्याच्या आऱोपाखाली कोर्टाने पतील कारावासाची आणि पत्नीला 55 हजारांची पोटगी देण्याचा आदेश दिला. यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी ही रक्कम कोर्टात जमा केली. पण ही रक्कम पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पतीने पत्नीला पोटगी म्हणून 55 हजारांची रक्कम चक्क पोत्यांमध्ये भरुन दिली. आता त्याने 55 हजार रुपये पोत्यात भरुन का दिले असावेत असा विचार तुम्ही करत असाल ना? तर यामागचं कारण म्हणजे पतीने हे 55 हजार रुपये नाण्यांच्या स्वरुपात आणले होते. या नाण्याचं वजन तब्बल 280 किलो होतं. म्हणून त्याने पोत्यांमध्ये भरुन पैसे आणले होते. पोत्यांमधून नाण्यांचा आवाज येत असल्याने सर्वजण आश्चर्याने पाहत होते. सर्व पोत्यांमध्ये 1,2,5 आणि 10 रुपयांची नाणी भरलेली होती. यानंतर कोर्टाने हे पैसे सुरक्षेत ठेवण्याचा आदेश दिला. 


नेमकं प्रकरण काय?


12 वर्षांपूर्वी दशरथ कुमावत आणि सीमा कुमावत यांचं लग्न झालं होतं. पण गेल्या पचा वर्षांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता. सीमाने आपल्या पतीविरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणीच कोर्टात खटला सुरु होता. मात्र पतीकडे 2.25 लाख रुपयांचा देखभाल भत्ता थकित आहे. पतीने देखभाल भत्ता न दिल्याने हरमाडा पोलिसांनी त्याला अटक करुन कोर्टात हजर केलं. 


कोर्टाने पतीला थकीत रकमेचा पहिला हप्ता भरायला सांगत तुरुंगात पाठवलं. दशरथ कुमावत जेलमध्ये असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी 55 हजारांची नाणी कोर्टात जमा केली. मात्र अद्यापही 1 लाख 70 हजारांची देखभाल भत्ता देणं शिल्लक आहे. 


दुसरीकडे, 55 हजारांची रक्कम नाण्यांच्या स्वरुपात दिल्याने पत्नी सीमा कुमावतचे वकील रामप्रकाश कुमावत यांनी हे छळ करण्यासाठी केलं जा असून, अमानवीय असल्याचं म्हटलं. तर दुसरीकडे पती दशरथ कुमावतच्या वकिलांनी हे 55 हजार रुपये वैध भारतीय चलन असून ती स्वीकार करण्याचं आवाहन केलं. 


दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात असणारी नाणी पाहून कोर्टानेही आश्चर्य व्यक्त केलं. हे पैसे मोजायला 10 दिवस लागतील असं कोर्टाने म्हटलं. आता या सर्व नाण्यांची मोजणी कुठे आणि कशी करायची? यासाठी कोर्टाने पतीला आदेश दिला आहे की, या सर्व नाण्यांची 1-1 हजारांच्या पिशव्या तयार करत त्यांची मोजणी करा. 26 जूनला या नाण्यांची मोजणी होणार आहे.