सोशल मीडियावर आपलं रिल व्हायरल व्हावं यासाठी काही तरुण-तरुणी कोणतीही पातळी गाठण्यास तयार असतात. यासाठी अनेकदा कायदाही हातात घेतला जातो. आपण इतरांसह आपल्याही आयुष्याला धोका निर्माण करत आहोत याची साधी जाणीवही त्यांना नसते. याचं कारण डोक्यात सोशल मीडियाचं भूत शिरलेलं असतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण रस्त्याच्या मधोमध बाईक पार्क करत खुर्चीवर आरामात बसल्याचं दिसत आहे. पण हे नसतं धाडस त्याला महाग पडलं असून, आयुष्यभराची अद्दल घडली आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमधील जीटी कर्नल रोडवर हा प्रकार घडला आहे. रिल बनवण्यासाठी एक तरुण वर्दळीच्या रस्त्यावर मधोमध बसला होता. दिल्ली पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. विपीन कुमार असं या तरुणाचं नाव आहे. 


व्हिडीओत तरुणाने रस्त्याच्या मधोमध बाईक पार्क केली असून, त्याच्या बाजूला खुर्ची टाकून बसल्याचं दिसत आहे. एकदम फिल्मी स्टाईलमध्ये तो खुर्चीवर बसला आहे. पोलिसांनी या व्हिडीओच्या आधारे त्याला अटक केली आहे. 



दिल्ली पोलिसांनी एक्सवर हा व्हिडीओ शेअर करत कारवाईची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की,  "दिल्ली पोलिसांनी जीटी रोडच्या मधोमध मोटारसायकल उभी करून रील बनवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मोटार वाहन कायदा आणि आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मोटारसायकल आणि मोबाइल फोन जप्त केला आहे. तसंच इंस्टाग्राम खातं डिलीट करण्याची प्रक्रिया सुरू आहे". 


या कंटेट क्रिएटरला अटक झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्याला मोठा दंड ठोठावला पाहिजे अशी मागणी काहींनी केली आहे. एका युजरने लिहिलं आहे की, "कोणत्या कलमांतर्गत करता येईल माहिती नाही, पण याला लाखांत दंड ठोठावला पाहिजे". अनेकांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलं आहे. 


"कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल धन्यवाद. फक्त रील बनवण्यासाठी, लोक इतरांची गैरसोय करतात आणि मोठी जोखीम घेतात," असं एका युजरने लिहिलं आहे. "सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करणं ही अशा सर्व लोकांसाठी प्रमाणित पद्धत असली पाहिजे, कारण नुसता दंड ठोठावून त्यांचं इतकं नुकसान होणार नाही, जितकं सोशल मीडियामुळे होऊ शकतं. पण ही कारवाई प्रत्येकावर सारखीच झाली पाहिजे," असं मत एका युजरने मांडलं आहे.