डेटिंग अॅपवरुन भेटलेल्या तरुणीने सगळं लुटलं; दोन दिवसांनी तरुणाला आली जाग, उठून पाहिलं तर अंगावरील...
डेटिंग अॅपवरुन भेट झालेल्या तरुणीला भेटायला जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने त्याचा आयफोन, सोन्याचे दागिने लुटले. इतकंच नाही तर त्याचं बँक खातंही रिकामं करण्यात आलं.
सध्याच्या तरुणाईसाठी डेटिंग अॅप ही एक सर्वसामान्य बाब आहे. याच्या माध्यमातून तरुण किंवा तरुणी आपल्याला हवा तसा जोडीदार शोधत असतात. पण नेमका याच गोष्टीचा फायदा घेत काहीजण गंडा घालण्याच्या तयारीत बसलेले असतात. गुरुग्राममधील एका तरुणाला अशाच धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. अनोळखी तरुणीच्या नादात तरुणाने आपला मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि बँक खात्यातील लाखोंची रक्कम गमावली आहे.
रोहित गुप्ता असं पीडित तरुणाचं नाव आहे. बंबल या डेटिंग अॅपवरुन त्याची साक्षी उर्फ पायल या तरुणीशी भेट झाली होती. दरम्यान या अनोळखी तरुणीला भेटायला जाणं रोहित गुप्ताला चांगलंच महागात पडलं आहे. त्याला ड्रग्ज देऊन बेशुद्ध करत तरुणीने त्याचा आयफोन, सोन्याचे दागिने लुटले. इतकंच नाही तर त्याच्या बँक खात्यातील 1 लाख 78 हजार लुटण्यात आले. तरुणीने आपण दिल्लीची असून, मावशीसह गुरुग्राममध्ये राहत असल्याचं सांगितलं होतं अशी माहिती पीडित तरुणाने दिली आहे.
"1 ऑक्टोबरला तिने फोन केला आणि मला भेटायचं असल्याचं सांगितलं. रात्री 10 वाजता तिने मला सेक्टर 47 मधील डॉकयार्ड बारमधून पिक करण्यासाठी फोन केला होता. यानंतर मी त्याला त्या ठिकाणी भेटलो होते. तिथे दारु विकत घेतल्यानंतर आम्ही आमच्या घरी परतल होतो," अशी माहिती रोहित गुप्ताने पोलीस तक्रारीत दिली आहे.
घरी गेल्यानंतर तरुणीने रोहितला किचनमधून बर्फ आणण्यास सांगितलं. रोहित तिथे नसल्याचा फायदा घेत तिने त्याच्या ड्रिंकमध्ये एक ड्रग मिसळलं. रोहितने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, "त्या ड्रग्जचा प्रभाव इतका होती की, मी 3 ऑक्टोबरच्या सकाळी उठलो. मी उठलो तेव्हा तरुणी तिथे नव्हती. माझ्या गळ्यातील सोन्याची चेन, आयफोन 14 प्रो, 10 हजार रोख रुपये यासह क्रेडिट आणि डेबिट कार्ड गायब होते"/
"मी तपासलं असता क्रेडिट आणि डेबिट कार्डमधून 1 लाख 78 हजार काढण्यात आले होते", असं रोहितने पोलीस तक्रारीत सांगितलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. आरोपी तरुणी अद्याप फरार आहे.