दिल्लीमध्ये एका विदेशी महिलेची निर्घृणपणे हत्या कऱण्यात आली आहे. पोलिसांना शुक्रवारी सकाळी एका सरकारी शाळेजवळ तिचा मृतदेह सापडला होता. काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीने हा मृतदे अर्धा झाकण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता धक्कादायक खुलासे झाले. या महिलेची हत्या करण्यासाठीच भारतात बोलावण्यात आल्याचं उघड झालं. संपूर्ण घटनाक्रम उलगडल्यानंतर पोलिसही चक्रावले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुरप्रीत सिंग नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी तिलक नगर परिसरात एका स्विस महिलेचा मृतदेह सापडला होता. लेना बर्गर अशी या महिलेची ओळख पटली आहे. प्लास्टिक बॅगमध्ये अर्धा झाकलेला मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुरप्रीत सिंग याला अटक केली आहे. 


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुरप्रीतची स्वित्झर्लंडमध्ये पीडित महिलेशी ओळख झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली होती. आरोपी गुरप्रीत हा अनेकदा लेनाची भेट घेण्यासाठी स्वित्झर्लंडला जात असे. यादरम्यान गुरप्रीतला लेनाचं दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय निर्माण झाला होता. यामुळेच त्याने तिची त्या करण्याचा कट आखला. यासाठीच त्याने लेनाला दुसऱ्या बहाण्याने भारतात बोलावलं होतं अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. 


गुरप्रीत सिंगने केलेल्या विनंतीनुसार, लेना 11 ऑक्टोबरला भारतात दाखल झाली होती. 5 दिवसांनी गुरप्रीत तिला एका रुमवर घेऊन गेला. येथे त्याने तिथे हात, पाय बांधले आणि हत्या केली. सुरुवातीला त्याने लेनाचा मृतदहे कारमध्ये ठेवला होता. लेनाच्याच ओळखपत्राच्या आधारे त्याने ही कार आणली होती. पण जेव्हा कारमधून दुर्गंध येऊ लागला तेव्हा त्याने घाबरुन मृतदेह रस्त्यावर फेकून दिला आणि पळ काढला. 


मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांच्या हाती सुरुवातीलाच काहीच पुरावे नव्हते. यानंतर त्यांनी सीसीटीव्ही तपासलं असता मृतदेह कोणी फेकला याचा उलगडा झाला. सीसीटीव्हीमधून पोलिसांनी कारच्या नंबरच्या आधारे माहिती मिळवली. या माहितीच्या आधार ते गुरप्रीतपर्यंत पोहोचले. पोलिसांनी ज्या कारमध्ये मृतदेह ठेवला होता तिच्यासह गुरप्रीतच्या मालकीची कारही जप्त केली आहे. पोलिसांनी गुरप्रीतच्या घऱातून 2 कोटी 25 लाखांची रक्कमही जप्त केली आहे.