यु-टर्न घेत मागे फिरला अन् 120 किमी वेगाने पोलिसांच्या गाडीलाच उडवलं, ASI जागीच ठार; कारण ऐकून सगळेच चक्रावले
पोलीस कर्मचारी कारवाई करण्यासाठी पुढे आला असता, एसयुव्ही चालकाने तेथून पळ काढला. पण काही अंतर पुढे गेल्यानंतर चालकाने यु-टर्न घेतला आणि उलट दिशेने कार पळवत पोलिसांच्या गाडीला धडक दिली. या धडकेत एएसआय भंवरलाल बिष्णोई यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आपल्या रस्त्यात रोखल्याने एक एसयुव्ही चालक इतका नाराज झाला की, त्याने चक्क धडक देत सहाय्यक पोलीस निरीक्षकाला ठार केलं. धडक देण्यासाठी तो यु-टर्न घेऊन मागे आला होता. धडक इतकी जबरदस्त होती की, एसयुव्ही चालकही ठार झाला आहे. तसंच पोलिसांच्या गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
जोधपूरच्या करवड ठाणे क्षेत्राच्या जोधपूर-नागौर हायवेवर मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजता ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एसयुव्ही चालक गाडी चालवत असताना कोणाशी तरी भांडत होता. यावेळी त्याने मद्यपानही केलं होतं. यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने रोखलं असता त्याची पोलीस कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली.
पोलीस दंड ठोठावण्यासाठी पुढे आले असता, चालकाने तेथून पळ काढला. पण काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यान यु-टर्न घेतला. यानंतर त्याने चुकीच्या दिशेने वेगाने गाडी पळवली आणि थेट पोलिसांच्या गाडीला नेऊन ठोकली. धडक इतकी जबरदस्त होती की, एएसआय भंवरलाल बिष्णोई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यासह एक पोलीस कॉन्सेटबलही जखमी झाला आहे. एसयुव्ही चालकाची ओळख पटली असून, नागौरचा रहिवासी होता. हरिशंकर वैष्णव असं त्याचं नाव आहे.
एसीपी मंडोर पियूष कविया यांनी सांगितलं आहे की, मद्यपान केलेल्या अवस्थेत चालक 110 ते 120 किमी वेगाने गाडी चालवत होता. हायवेवर पोलिसांची इंटरसेप्टर व्हॅन उभी होती. यावेळी जोधपूरच्या दिशेने एक कार वेगाने येत असल्याचं पोलिसांना दिसलं. पोलिसांनी गाडी रोखली असता त्याने मद्यपान केल्याचं दिसलं. चौकशी केली असता त्याने वाद घातला आणि नंत वेगाने नागौरच्या दिशेने गाडी पळवत निघून गेला. काही अंतर पुढे गेल्यानंतर तो पुन्हा मागे फिरला आणि पोलिसांच्या व्हॅनला धडक दिली. धडक इतकी वेगाने दिली की, कारचा चुराडा झाला आणि एएसआय भंवरलाल यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलीस क्षेत्रात खळबळ उडाली असून, एएसआयच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलीस याप्रकरणी अधिक माहिती घेत असून, तपास करत आहेत.