प्रेयसीची हत्या करण्यासाठी प्रेशर कुकर उचलला अन्...; दरवाजा उघडल्यानंतर शेजाऱ्यांसह पोलीसही चक्रावले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णव आणि देवा हे दोघेही मूळचे केरळचे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते बंगळुरुत वास्तव्य करत होते.
बंगळुरुत 29 वर्षीय तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपं बंगळुरुत भाड्याच्या घऱात राहत होतं. यावेळी वाद झाला असता आरोपी तरुणाने डोक्यात प्रेशर कुकर घालून तरुणीची हत्या केली. तरुणीच्या बहिणीने फोन केला असता ती उत्तर देत नसल्याने ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला असता दरवाजा उघडून पाहण्यात आलं. यावेळी तरुणी मृतावस्थेत पडलेली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय वैष्णव आणि 24 वर्षीय देवा लिव्ह-इनमध्ये राहत होते. मूळचे केरळचे असणाऱ्या दोघांनी बंगळुरुत भाड्याने घर घेतलं होतं. गेल्या दोन वर्षांपासून दोघे एकत्र होते. दोघांची कॉलेजपासूनची ओळख होती. तसंच बंगळुरुतील एकाच सेल्स आणि मार्केटिंग कंपनीत कामाला होते. दरम्यान, वैष्णवला गेल्या काही दिवसांपासून देवा आपली फसवणूक करत असल्याचा संशय आला होता.
शनिवारी वैष्णव आणि देवा यांच्यात वाद झाला. यावेळी वैष्णवने देवाला प्रेशर कुकरने मारहाण केली. यामध्ये देवाचा जागीच मृत्यू झाला. देवाची बहिण तिला सतत फोन करत होती. पण ती फोन उचलत नसल्याने तिने शेजाऱ्यांना फोन केला. शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावून पाहिलं असता काहीच उत्तर मिळत नव्हतं. यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली.
"वैष्णवला आपल्या जोडीदारासंबंधी काही संशय होते. यावरुनच त्यांच्यात भांडणं होत होती. रविवारी पुन्हा त्यांच्यात भांडण झालं होतं. यावेळी त्याने प्रेशर कुकरने तिला मारलं," अशी माहिती दक्षिण बंगळुरुचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सी के बाबा यांनी दिली आहे.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, हत्या केल्यानंतर वैष्णवने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पण पोलिसांनी त्याला पकडलं असून, बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपी वैष्णवविरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याची सध्या चौकशी सुरु आहे. हत्येमागे अजून काही कारण आहे का याचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी वैष्णव आणि देवा यांच्या पालकांची चौकशी केली असता, त्यांना दोघे लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची कल्पना होती अशी माहिती मिळाली आहे. तसंच त्यांना दोघांमधील वादाचीही कल्पना होती. हे प्रकरण मिटवण्याचा ते प्रयत्न करत होते. शेजाऱ्यांनीही दोघांमध्ये नेहमी भांडणं होत होती अशी माहिती पोलिसांना दिली आहे.