पोलीस क्वार्टरमध्ये सकाळी दुधवाला पोहोचल्यानंतर एकच खळबळ, अख्खं कुटुंब रक्ताच्या...; दृश्य पाहून पोलीसही हादरले
Crime News: पोलीस क्वार्टमध्ये एका तरुणाने आपल्या कॉन्स्टेबल पत्नीसह, आपली आई आणि दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली.
Crime News: बिहारच्या भागलपूर पोलीस लाईनमध्ये एका तरुणीने आपल्या कॉन्स्टेबल पत्नीची हत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्याने पत्नीसह आपली आई आणि दोन मुलांचीही हत्या केली. यानंतर त्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये पतीने पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचा उल्लेख केला आहे. प्रेमविवाह केलेल्या या दांपत्याचा असा अंत झाल्यानंतर परिसरात सर्वांना धक्का बसला आहे.
नितू आणि पंकज यांची एका मॉलमध्ये नोकरी करताना भेट झाली होती. नंतर ही मैत्री प्रेमात बदलली होती. यादरम्यान नितू बिहार पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेची तयारी करत होती. 2015 मध्ये तिला यश मिळालं आणि पोलिसात भरती झाली. 2019 मध्ये नितू आणि पंकज यांचं लग्न झालं. त्यांना दोन मुलं झाली.
सरकारी नोकरी असल्याने नितूला पोलीस लाईनच्या क्वार्टमध्ये राहण्यास जागा मिळाली. तिथे ती पंकज, दोन मुलं आणि सासूसह राहत होती. पंकज यादरम्यान एका शूजच्या दुकानात काम करत होता. पण यानंतर मात्र त्यांच्या संसाराला नजर लागली आणि भांडणं सुरु झाली. विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन पंकज नितूशी भांडू लागला. पत्नी नितूचे कोणाशी तरी संबंध आहे असा पंकजला संशय वाटू लागला.
भागलपूरचे डीआयजी विवेकानंद यांनी सांगितलं की, सोमवारी आणि मंगळवारी रात्री ही घटना घडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दूधवाल्याने घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहिले आणि शेजाऱ्यांना माहिती दिली. पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. यावेळी काही मृतदेह बेड तर काही जमिनीवर होते. तर पंकजने गळफास घेतलेल्या स्थितीत होता.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पोलीस लाईनमधील आपल्या घराबाहेर नितू आणि पंकज यांच्यात कशावरुन तरी वाद झाला होता.पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये पंकजने स्वत: आत्महत्या करण्याआधी पत्नी आणि दोन्ही मुलं, आईला ठार केल्याची कबुली दिली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचंही त्याने सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.