Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेस हे नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. कधी गायींना धडक दिल्याने, तर कधी प्रवाशांनी दगडफेक केल्याने वंदे भारतची चर्चा सुरु असते. पण आता मात्र एका प्रवाशाने वंदे भारतमध्ये असं काही केलं ज्याचा भुर्दंड इतर प्रवाशांना भोगावा लागला. वंदे भारतमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या या प्रवाशाने सिगारेट पेटवल्याने एकच धावपळ सुरु झाली होती. काही प्रवाशांनी तर काचाही फोडल्या. सुरुवातीला प्रवाशांना नेमकं काय झालं होतं हे कळलं नाही. पण रेल्वे पोलिसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतलं आणि सगळा प्रकार उघड झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंदे भारतची ही ट्रेन आंध्रप्रदेशच्या तिरुपती (Tirupati in Andhra Pradesh) येथून सिकंदराबादला (Secunderabad) निघाली होती. ट्रेन आपल्या अंतिम स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी अद्यापही 8 तास शिल्लक होते. दरम्यान या ट्रेनमध्ये एक असाही प्रवासी होता जो विनातिकीट प्रवास करत होता. आपण पकडले जाऊ नये म्हणून त्याने स्वत:ला शौचालयात बंद करुन घेतलं होतं. कदाचित त्याचा संपूर्ण प्रवास मोफतही झाला असता. पण त्याने केलेल्या एका गोष्टीमुळे तो पकडला गेला.


वंदे भारतमध्ये फायर अलार्म लावले असल्याची या प्रवाशाला अजिबात कल्पना नव्हती. यामुळे शौचालयात बसलेला असताना त्याला धुम्रपान करण्याची इच्छा झाली. यानंतर त्याने सिगारेट काढली आणि ती पेटवली. पण यामुळे फायर अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. तसंच अग्नीरोधक यंत्रणाही कार्यान्वित झाली आणि डब्यांमध्ये पाण्याचा फवारा सुरु झाला. 


आग लागली असावी अशी शंका मनात आल्याने काही प्रवासी घाबरले आणि धावपळ सुरु झाली. यातील काही प्रवाशांनी ट्रेन गार्डला फोन करुन माहिती दिली. यानंतर ट्रेन पुढील स्थानकावर थांबवण्यात आली. 



ट्रेन थांबल्यानंत रेल्वे पोलीसही आग विझवण्याच्या हेतूने आत शिरले. यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आलं. पण त्यांनी शौचालयाचा दरवाजा उघडून पाहिलं असता आतमध्ये एक प्रवासी बसला होता. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने पेटवलेल्या सिगारेटमुळे हा सगळा प्रकार घडल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांनी प्रवाशाला ताब्यात घेतलं आणि ट्रेन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली. 


मात्र त्या व्यक्तीच्या एका मूर्खपणामुळे इतर प्रवाशांन विनाकारण भुर्दंड भोगावा लागला. ट्रेनमधील व्हिडीओ समोर आले असून, यामध्ये धूराने भरलेले डबे, फुटलेल्या खि़डक्या दिसत आहेत. 


"एक प्रवासी विनातिकीट तिरुपतीहून ट्रेनमध्ये चढला आणि त्याने C-13 कोचच्या टॉयलेटमध्ये स्वतःला कोंडून घेतलं. त्याने टॉयलेटच्या आत धुम्रपान केलं ज्यामुळे टॉयलेटमध्ये एरोसोल अग्निशामक यंत्र स्वयंचलितपणे सक्रिय झाले," अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने ( SCR) दिली आहे.