Married Man Fraud: तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश राज्यात एका 35 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने 13 लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सायबराबाद पोलिसांनी याप्रकरणी अदापा शिवशंकर बाबू या व्यक्तीला अटक केली आहे. अदापा हा आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी असून घटस्फोटित महिलांशी विवाह करायचा आणि त्यांचे पैसे आणि मौल्यवान वस्तू घेऊन फरार व्हायचा. आरोपीविरुद्ध हैदराबाद, राचकोंडा, संगारेड्डी, गुंटूर, विजयवाडा आणि अनंतपूर येथे गुन्हे दाखल आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी घटस्फोटित आणि मॅट्रिमोनिअल साईट्सवर लाइफ पार्टनर शोधणाऱ्या श्रीमंत महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. आरोपीने घटस्फोटाची बनावट कागदपत्रे तयार केली होती.  पीडितांपैकी एकीने रामचंद्रपुरम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपी अदापा शिवशंकर बाबूने तक्रार महिलेचे 25 लाख रुपये रोख आणि 7 लाख रुपयांचं सोने घेतले होते आणि ते परत करत नव्हता. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.


महिलांना अशा प्रकारे अडकवायचा


पीडितेने पत्रकार परिषदेत सांगितले की, बाबूने 2021 मध्ये मॅट्रिमोनियल साइटद्वारे तिच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याने  आई-वडील खूप पूर्वी मरण पावले असल्याचे सांगून एका नामांकित फर्ममध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असल्याचं सांगितलं. तसेच मासिक पगार दोन लाख रुपये असून तो घटस्फोटित आहे. त्याचबरोबर योग्य पत्नीच्या शोधात असल्याचं सांगितलं. तसेच अमेरिकेला नेण्याचे आश्वासनही दिले होते. पीडितेच्या आई-वडिलांनी बोलणी झाल्यानंतर बाबूसोबत लग्न लावून दिलं. अमेरिकेला नेण्याच्या बहाण्याने त्याने आई-वडिलांकडून सुमारे 25 लाख रुपये घेतले. मात्र बरेच दिवस होऊनही अमेरिकेला जाण्याचा कोणताही प्लॅन दिसत नसल्याने पालकांनी त्याच्याकडे पैसे मागितले. तेव्हा बाबूने उडवाउडवीची उत्तरं देत पालक आणि पीडितेला टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित महिला आणि कुटुंबाने रामचंद्रपुरम पोलिसात तक्रार दाखल केली. 


पोलिसांनी बाबूला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले असता, तो आधीच विवाहित असल्याचे समजल्यावर पीडितेला धक्काच बसला. आरोपी एका महिलेला घेऊन पोलीस ठाण्यात आला होता आणि ती त्याची बाजू घेत तो पैसे परत करणार असल्याचे पोलिसांना सांगत होती. पीडितेने गुपचूप दुसऱ्या महिलेला भेटून तिची चौकशी केली असता तिच्या पायाखालची जमीनच सरकरली. तेव्हा तिला त्याच कॉलनीतील आणखी एका महिलेबद्दल कळले जिचे बाबूशी लग्न झाले होते. दिवसा आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये कामाला जात असल्याचं सांगून प्रत्येकासोबत वेळ घालवत पीडितांना फसवत होता. दुसरीकडे बाबूने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून कोणाकडूनही पैसे घेतले नसल्याचा दावा केला आहे.