जमीन, संपत्तीसाठी कुटुंबांमध्ये भांडणं होणं काही नवं नाही. संपत्तीसाठी अनेक कुटुंबं एकमेकांच्या जीवावर उठतात. खासकरुन हे वाद भावा-बहिणींमध्ये असतात. पण संपत्तीसाठी एखाद्या मुलाने आपल्या आई-वडिलांवर हात उचलणं याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. पण नेमकी अशीच घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी मुलाने आपल्याच आई-वडिलांनाच बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, लोक संताप व्यक्त करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपत्तीच्या वादातून मुलाने आपल्या आई-वडिलांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली. त्याने आपल्या आईला केस पकडून फरफटत आणलं होतं. यावेळी आई रडत असतानाही तो तिला सतत कानाखाली मारत होता. यावेळी महिला मुलाकडे मारहाण करु नको यासाठी विनवणी करत होती. व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार एका क्षणी तर मुलाने आईला इतक्या जोरात लाथ मारली की ती धाडकन खाली जमिनीवर कोसळली. पण यानंतरही मुलाने अत्याचार करणं सुरुच ठेवलं होतं. 


आई जमिनीवर पडून रडत असताना, मुलगा वडिलांच्या दिशेने जातो आणि मारहाण करण्यास सुरुवात करतो. यावेळी एक लहान मुलगी त्या माणसाच्या शेजारी उभी होती. यादरम्यान काही लोकही व्हिडीओत दिसत आहेत. हे सर्वजण मुलगा आई-वडिलांना माहाण करताना पाहत होते. पण एकही जण मदतीसाठी पुढे आला नाही. 


पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलाची ओळख पटली असून, त्याचं नाव श्रीनिवासुलू रेड्डी आहे. अन्नामय्या जिल्ह्यात झालेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, तीन एकर जमीन मोठा भाऊ मनोहर रेड्डीच्या नावे केल्याने श्रीनिवासुलू संतापला होता. आपले आई-वडील लक्ष्मम्मा आणि व्यंकटरमण यांनी यात बदल करावा अशी त्याची इच्छा होती. दांपत्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आपण मुलाची मागणी मान्य करण्यास तयार असतानाही तो मारहाण करण्यापासून थांबत नव्हता. 


स्थानिक पोलीस निरीक्षक युवराजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या आई-वडिलांना अशी वागणूक देणारे शिक्षेस पात्र आहेत. जर असे प्रकार घडत असतील तर पालक किंवा घरातील ज्येष्ठ नागरिकांनी त्याची माहिती दिली पाहिजे.