राजस्थानमध्ये एका महिलेचं धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. सिकर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून महिलेची तरुणाशी ओळख झाली होती. यानंतर त्यांच्या बोलणं सुरु झालं होतं. याचदरम्यान, महिला या तरुणाच्या जाळ्यात अडकली. तरुण तिला कशाप्रकारे नमाज पठण करायचं याबद्दल सतत सांगत होता. याची माहिती महिलेच्या माहेरच्या लोकांना मिळाली. यानंतर त्यांनी सीकरच्या पोलीस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार केली. पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी तपास सुरु केला असून यावेळी तरुण आणि महिलेत झालेलं व्हॉट्सअप चॅटही त्यांच्या हाती लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदर पोलीस ठाण्याच्या ग्रामीण क्षेत्रात हा प्रकार घडला आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी पीडित महिला ऑनलाइन गेम 'फ्री फायर'च्या माध्यमातून तैय्यब नावाच्या एका तरुणाला भेटली होती. येथेच त्यांची पहिल्यांदा ओळख झाली होती. तैय्यबने महिलेला आपण अलीगडमध्ये वास्तव्यास असल्याचं सांगितलं होतं. तसंच आपलं कपड्याचं दुकान असल्याचंही म्हटलं होतं. यानंतर दोघांनी एकमेकांना आपले मोबाइल नंबर दिले होते. दोघांमध्ये यानंतर बोलणं सुरु झालं होतं. हळूहळू तैय्यबने या विवाहित महिलेला आपल्या जाळ्यात ओढलं. 


टिकली, कुंकू लावण्यास नकार


व्हॉट्सअपवर चॅट करताना तैय्यब महिलेला मुस्लीम नावाने हाक मारत होता. इतकंच नाही तर त्याने तिला अशा अनेक लिंक पाठवल्या होत्या, ज्यामध्ये नमाज पठण कसं केलं जावं याबद्दल सांगण्यात आलं होतं. त्याने महिलेला पूजा करण्यापासून तसंच टिकली, कुंकू लावण्यापासूनही रोखलं होतं. 


वागण्यात बदल जाणवल्याने कुटुंबाला संशय


महिलेच्या वागण्यात बदल दिसत असल्याने कुटुंबाला संशय आला. त्यांनी माहिती घेतली असता त्यांनी तैय्यबबद्दल कळलं. यानंतर कुटुंबीयांनी तैय्यबशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण बोलणं झाल्यानंतर तैय्यबने आपला फोन बंद केला. दुसऱ्यांदा फोन लावल्यानंतर दुसऱ्या एका तरुणाने फोन उचलला. त्याने आपला मित्र असं करु शकत नाही सांगत आरोप फेटाळून लावले. यानंतर महिलेच्या माहेरच्या लोकांनी सिकरच्या पोलीस अधिक्षकांकडे धाव घेतली आणि सगळा घटनाक्रम सांगितला. पोलीस अधिक्षकांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती परदेशात नोकरी करतो. यामुळे महिला आपल्या माहेरी राहत होती. कुटुंबाने चौकशी केली असता आपण तैय्यबवर प्रेम करत असल्याचं तिने सांगितलं. 


याप्रकरणी पोलीस अधीक्षक करण शर्मा यांनी सांगितलं आहे की, विवाहित महिलेला ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून मित्राने धर्मपरिवर्तन करण्यास सांगितलं. याप्ररणी तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.