बिहारच्या भागलपूरमध्ये जगातील सर्वात विषारी सापांपैकी असणाऱ्या रसेल वाइपरने एका व्यक्तीला दंश केला. यानंतर त्याने जे काही केलं ते अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होतं. प्रकाश मंडल याने या विषारी सापाचं तोंड पकडलं. यानंतर त्याला आपल्या गळ्यात लटकवून थेट हॉस्पिटल गाठलं. गळ्यात सापाला लकटवून तो रुग्णालयात पोहोचला तेव्हा डॉक्टर आणि रुग्ण आश्चर्याने पाहत होते. सर्पदंश झाला असल्याने आपल्यावर तात्काळ उपचार करा असं तो डॉक्टरांना सांगत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णालयात धोतर नेसलेला प्रकाश हातात साप पकडून झोपला होता तेव्हा सर्वजण मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार रेकॉर्ड करत होते. दुसरीकडे प्रकाशवर उपचार करण्यासाठी आलेले कर्मचारीही दूरच उभे होते. जर साप त्याच्या हातातून निसटला आणि आपल्या अंगावर आला तर काय? अशी भिती सर्वांना सतावत होती. यावेळी एक व्यक्ती प्रकाशचा हात पकडून त्याला गर्दी नसलेल्या ठिकाणी नेत होता. जेणेकरुन इतरांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही. 


यानंतर प्रकाशने जे केलं ते आणखी आश्चर्यकारक होतं. सापाला हातात पकडून तो तसाच खाली जमिनीवर झोपून गेला. दुसऱ्या एका व्हिडीओत प्रकाश सापासह स्ट्रेचरवर झोपलेला दिसत आहे. यावेळी त्याला प्रचंड वेदना होत होत्या. पण या स्थितीतही आपल्या हातातून साप निसटणार नाही याची काळजी तो घेत होता. 


जर त्याने सापाला असंच पकडून ठेवलं तर त्याच्यावर उपचार करणं कठीण होईल असं डॉक्टर सांगत होते. यानंतर अखेर त्याने सापाला जाऊ दिलं. यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान त्याची स्थिती नेमकी कशी आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. 


रसेल वाइपर हा व्हिपेरिडे अत्यंत विषारी साप आहे. भारतासह तैवान आणि जावापर्यंत बहुतेकदा खुल्या देशात तो आढळतो. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचं हे एक प्रमुख कारण आहे कारण ते बहुधा शेतजमिनींमध्ये असते जेथे मानवी संपर्क मुबलक असतो.