लग्नात भेटवस्तू म्हणून मिळालेल्या होम थिएटर म्युझिक सिस्टमचा स्फोट झाल्याने नवरदेव आणि त्याच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान या स्फोटात चौघे जखमी झाले आहेत. कबीरधाम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सोमवारी हा स्फोट झाला. दरम्यान, स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्फोट इतका भीषण होता की, होम थिएटर म्युझिक सिस्टम ज्या खोलीत ठेवण्यात आला होता त्याचं छत आणि भिंती कोसळल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. छत्तीसगड-मध्य प्रदेशच्या सीमेवर येणाऱ्या या परिसरात नक्षलवाद्यांचं वर्चस्व आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, हेमेंद्र याचं 1 एप्रिलला लग्न झालं होतं. सोमवारी हेंमेद्र आणि कुटुंबातील इतर सदस्य घरातील एका खोलीत बसून लग्नात मिळालेल्या भेटवस्तू पाहत होते अशी माहिती पोलीस अधिक्षक मनिषा ठाकूर यांनी दिली आहे. हेमेंद्र याने यावेळी होम थिएटर म्युझिक सिस्टम सुरु करण्याचा प्रयत्न केला असता एक मोठा स्फोट झाला. स्फोट भीषण असल्याने हेमेंद्र याचा जागीच मृत्यू झाला. 


हेमेंद्र याचा भाऊ आणि इतर चौघे या स्फोटात जखमी झाले होते. यामध्ये एका दीड वर्षाच्या मुलाचाही सहभाग होता. त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. उपचारादरम्यान हेमेंद्रचा भाऊ राजकुमार याचं निधन झालं. दरम्यान इतर दोघांवर रुग्णालयाच उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


घटनेनंतर पोलिसांना कळवण्यात आलं होतं. यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक एक्स्पर्ट घटनास्थळी दाखल झाले होते. स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती घेत असल्याचं मनिषा ठाकूर यांनी सांगितलं आहे. 


घराची पाहणी केली असता स्फोटासाठी कारणीभूत ठरेल अशी कोणतीही ज्वलनशील वस्तू सापडली नसल्याचं स्टेशन हाऊस ऑफिसर दुर्गेश रावते यांनी सांगितलं आहे. घरात फक्त म्युझिक सिस्टमचा स्फोट झाला असून तपासानंतरच खरं कारण समोर येईल असंही त्यांनी सांगितलं आहे.