गुजरातमध्ये माकडाच्या हल्ल्यात 10 वर्षांचा मुलगा ठार झाला आहे. माकडाने अत्यंत निर्दयीपणे मुलाची हत्या केली. माकडाने मुलाचं पोट फाडलं अन् नंतर त्याचं आतडं बाहेर काढलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गांधीनगरमधील सालकी गावात हा प्रकार घडला. देहगाम तालुक्यात मंदिराजवळ माकडाने मुलावर हल्ला केल्याचं वनअधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दीपक ठाकोर असं पीडित मुलाचं नाव आहे. मुलाला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी उपचार सुरु करण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक आपल्या मित्रांसह खेळत होता. यावेळी माकडांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर काही माकडांनी दीपकच्या अंगावर उडी मारली. नंतर त्यांनी आपले पंजे त्याच्या शरिरात घुसवले आणि चिरफाड केली. 


"माकडांनी त्याची आतडी ओढून बाहेर काढली. त्याला आधी घरी नेण्यात आलं आणि मग तिथून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं," अशी माहिती अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना दिली आहे. एका आठवड्यात तिसऱ्यांदा माकडाने हल्ला केला आहे असंही अधिकाऱ्याने सांगितलं.
 
वनअधिकारी विशाल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही गावात उच्छाद मांडणाऱ्या माकडांना पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. "गेल्या आठवड्यात आम्ही दोन माकडांची सुटका केली आहे. इतर माकडांना पकडण्यासाठी आम्ही जाळं टाकलं आहे. गावात गेल्या आठवड्यापासून माकडांच्या टोळीने उच्छाद मांडला आहे. यामधील चार माकडं मोठी आहेत. दोघांची सुटका केली असून, इतरांना पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे," असं विशाल चौधरी यांनी सांगितलं आहे.


या वर्षाच्या सुरुवातीला, मध्य प्रदेशातील राजगढ शहरात दोन आठवडे लोकांमध्ये दहशत माजवल्यानंतर  21 हजारांचं इनाम असणारं माकड पकडलं गेलं होतं. त्याने एकूण 20 लोकांवर हल्ला केला होता. माकडाचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता.  यानंतर डार्टच्या सहाय्याने त्यांना बेशुद्ध करत पकडण्यात आलं.