मुंबई : दुस-या लाटेत कोरोनाची नव नवी रूपं समोर आली आहेत. कोरोनाचं भारतीय व्हेरियंट घातक असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी पुढे आलीय. भारतातील कोरोना व्हेरियंटमुळे रूग्णांचं वजन घटतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या 7 दिवसांत घटतं रूग्णाचं वजन


भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरी कोरोनाची बदलती रूपं सर्वांसाठी चिंतेचा विषय बनली आहेत. आता कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आला असून तो रूग्णाच्या वजनावर परिणाम करत असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हेरियंटचं नाव बी.1.1.28.2 असं आहे. 


नव्या स्ट्रेनचा अँटीबॉडिजवरही परिणाम 


संशोधकांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा उंदरांवर प्रयोग केला. तेव्हा जे परिणाम समोर आले ते अतिशय धक्कादायक होते. हा नवा व्हेरियंट इतका घातक आहे की ज्यामुळे रूग्णाचं वजन 7 दिवसात कमी होतं. शिवाय शरीरातील अँटबॉडिजही कमी होतात. तर पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार बी. 1.1.28.2 व्हेरियंट सर्वात आधी परदेशातून आलेल्या दोन व्यक्तींच्या शरीरात सापडला. मात्र सध्या भारतात डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत या व्हेरियंटच्या रूग्णांची संख्या फारच कमी आहे. 


कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने आधीच संपूर्ण देशात हाहाकार माजवलाय. त्यात वजन घटवणा-या नव्या स्ट्रेनची भर पडलीय. दुसरी लाट ओसरली असली तरी संभाव्य धोका टळलेला नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं.